‘FIA’च्या 42व्या ‘डान्स पे चान्स’ कार्यक्रमात, कडाक्याच्या थंडीला न जुमानता 870 स्पर्धकांचा बहारदार नृत्याविष्कार
ट्रेंटन, न्यू जर्सी: ‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स’ (FIA-NY-NJ-CT-NE) यांनी आपल्या ‘डान्स पे चान्स’ (डीपीसी) या आपल्या प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रमाची ४२ वी आवृत्ती शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी न्यू जर्सीतील ट्रेंटन येथील वॉर मेमोरियलमधील पॅट्रियट्स थिएटरमध्ये यशस्वीरीत्या सादर केली. भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन आणि ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५०व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अमेरिकेतील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित भारतीय-अमेरिकन नृत्यस्पर्धांपैकी एक म्हणून ‘डान्स पे चान्स’चे महत्त्व यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
या नृत्यस्पर्धेला २,२०० हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. यामध्ये मान्यवर लोक, भारतीय समुदायातील प्रमुख नेते आणि सांस्कृतिक रसिकांचा समावेश होता. भारतीय शास्त्रीय, लोकनृत्य, बॉलिवूड आणि समकालीन नृत्यप्रकारांनी प्रेरित ताल, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक परंपरेचे अप्रतिम दर्शन प्रेक्षकांना यावेळी अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतांनी झाली. त्यानंतर ‘एफआयए’ची ध्येयधोरणे व कामगिरीची माहिती देणारी सादरीकरणे करण्यात आली. ‘डीपीसी’च्या अध्यक्षा श्रीमती प्रीती रे-पटेल यांनी ‘डान्स पे चान्स’च्या चार दशकांच्या परंपरेवर अभ्यासू भाष्य केले. ‘एफआयए’ अध्यक्ष श्री. श्रीकांथ अक्कापल्ली यांनी वर्षातील महत्त्वाचे टप्पे मांडले आणि स्वयंसेवकांच्या मोलाच्या भूमिकेवर भर दिला. ‘एफआयए’ चेअरमन श्री अंकुर वैद्य यांनी ‘एफआयए’ची सातत्यपूर्ण वाढ ही भारतीय प्रवासी समुदायाला एकत्र बांधणारी शक्ती असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमातील एक विशेष आकर्षणबिंदू होता ‘एफआयए’च्या २०२६ कार्यकारी समितीचा शपथविधी, जो भारताचे माननीय महावाणिज्यदूत, राजदूत बिनय एस. प्रधान यांच्या हस्ते पार पडला. आपल्या भाषणात राजदूत बिनय प्रधान यांनी या कार्यक्रमाचा व्याप आणि प्रभाव सातत्याने वाढवत नेल्याबद्दल ‘एफआयए’चे कौतुक केले. तसेच भारतीय प्रवासी समुदायाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध वाढीव वाणिज्यदूत सेवांची उपस्थितांना माहिती दिली. न्यूयॉर्कचे माननीय उप-महावाणिज्यदूत विशाल जे. हर्ष यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून भारतीय समुदायाला पाठिंबा दिला आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व प्रवासी समुदायाशी संवाद राखण्याच्या ‘एफआयए’च्या सातत्यपूर्ण बांधिलकीची आवर्जून दखल घेतली.
या नृत्यस्पर्धेचे परीक्षण नामवंत परीक्षक मंडळाने केले. यामध्ये दिग्गज अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सुप्रिया दोशी आणि ख्यातनाम शास्त्रीय नृत्यांगना अंतिमा चक्रवर्ती यांचा समावेश होता. त्यांच्या तज्ज्ञ व बहुमोल सूचनांनी सहभागी कलाकारांना त्यांची सर्जनशील व कलात्मक सीमारेषा पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमसी श्रीमती ममता नरुला आणि श्रीमती सृष्टी नरुला यांनी अत्यंत कौशल्याने केले, ज्यामुळे प्रेक्षक संपूर्ण संध्याकाळ कार्यक्रमांत गुंतून राहिले.
या वर्षीच्या ‘डीपीसी’च्या आवृत्तीत आघाडीच्या १८ नृत्य संस्थांमधील सुमारे ८७० कलाकार सहभागी झाले होते. मायनर, ज्युनिअर, सीनियर आणि अॅडल्ट अशा गटांमध्ये एकूण ३१ नेत्रदीपक सादरीकरणे झाली. पारंपरिक आणि आधुनिक नृत्यशैलींच्या प्रभावी संगमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवताना समकालीन अभिव्यक्तीलाही स्थान देण्यात आले. ब्रॉडवे-शैलीतील निर्मिती घटकांचा उपयोग या स्पर्धेत करण्यात आला ज्यात, भव्य एलईडी पार्श्वभूमी, प्रभावी प्रकाशयोजना आणि देखण्या वेशभूषा, यांनी या नृत्याविष्काराला वेगळीच झळाळी लाभली. त्यामुळे रंगमंचावरील सर्वांचा वावर विलक्षण देखणा झाला.
अंतिम फेरीच्या सांगता समारोपात १०० हून अधिक समर्पित स्वयंसेवकांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. त्यानंतर बहुप्रतिक्षित पारितोषिक वितरण सोहळा पार पडला, ज्यामध्ये उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन, विषयात्मक नवकल्पना आणि उल्लेखनीय प्रदर्शन अशा विविध श्रेणींतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमातून ‘एफआयए’ नेतृत्वाने पुन्हा एकदा अधोरेखित केले की ‘डान्स पे चान्स’ ही नृत्यस्पर्धा दोन पिढ्यांमधील दुवा म्हणून कार्य करत असून, भारतीय-अमेरिकन समुदायामध्ये सांस्कृतिक अभिमान, युवा नेतृत्व आणि कलात्मक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देत आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या ४३व्या आवृत्तीच्या नियोजनाला आधीच सुरुवात झाली असून, ती आणखी भव्य असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स’ (FIA-NY-NJ-CT-NE):
‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स’ ही अमेरिकेच्या ईशान्य भागातील भारतीय-अमेरिकन समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात जुनी आणि मोठ्या, ना-नफा ना-तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या प्रमुख संस्थाांपैकी एक आहे. सांस्कृतिक, नागरी आणि सामुदायिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘एफआयए,’ सांस्कृतिक वारसा जपणे, सामुदायिक एकता वाढवणे आणि भारतीय प्रवासी समुदायाच्या योगदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी कार्यरत आहे.









