Karad LPG Gas Shortage Issue : 55 दिवस उलटूनही काले गावात भारत गॅसचा सिलेंडर मिळेना; गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील

Karad LPG Gas Shortage Issue : इराण इस्रायल यांच्या युद्धामुळे भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. भारत बहुतांश गॅस आणि ऊर्जा आखाती देशातून आयात करत असल्याने देशांतर्गत पुरवठा काहीसा ठप्प आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर बुकिंग आणि वितरणामध्ये केंद्र सरकारकडून सातत्याने नवनवीन नियम लागू करण्यात येत आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील नागरिकांना 45 दिवसानंतर गॅस सिलिंडर मिळेल असं केंद्राकडून सांगण्यात आलं. मात्र बुकिंग करून 10 दिवस होऊनही कराड तालुक्यातील काले या गावात मात्र नागरिकांना गॅसची टाकी काही मिळेना झाली आहे.

एकीकडे देशांतर्गत गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये कोणताही तुटवडा नाही. सरकारकडे आवश्यक असा साठा असल्याचे केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे याच महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरची परिस्थिती अतिशय भीषण झाली आहे. कराड तालुक्यातील काले गावात तर बुकिंग नंतर 10 दिवस होऊनही आणि आधीचा सिलेंडर घेऊन 2 महिने उलटूनही गॅस सिलिंडर न मिळाल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गावातच यशोदीप भारतगॅस ग्रामीण वितरण केंद्र असूनही गॅस सिलेंडरच्या टाकीसाठी कालेकरांना सातत्याने हेलपाटे घालायला लागत आहेत.

काले गावात हिंदुस्थान पेट्रोलियम म्हणजेच एचपी गॅस च्या टाक्या वेळेवर मिळत आहेत मात्र दुसरीकडे खुद्द गावातच भारत गॅसचे ऑफिस असूनही पिवळ्या पट्ट्याच्या या टाकीसाठी गावकऱ्यांना सातत्याने हेलपाटे घालावे लागत आहेत. सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्ही 45 दिवसांनी गॅसचे बुकिंग केलं, मात्र आता बुकिंग करूनही 10 दिवस उलटले, मात्र आम्हाला अजून गॅस का मिळत नाही असा सवाल कालेकरांकडून करण्यात येतोय. एकीकडे HP GAS वेळेवर मिळत असताना भारत गॅस मध्ये काय भानगड आहे हे कळायला मार्ग नाही. 55 ते 60 दिवसांचा कालावधी हा तसा प्रचंड झाला. इतका वेळ आम्ही शांत बसूनही टाकी मिळत नसेल तर आता करायचं काय असा सवाल करत कालेकर ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.

आजकाल मुंबई पुण्यासारख्या शहरातही गॅस सिलेंडर अगदी वेळेवर मिळतोय. कराड तालुक्यात सुद्धा गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीतपणे चालले आहे. मात्र काले गावातच भारत गॅस सिलेंडरच्या वितरणात काय भानगड आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. आता गावकऱ्यांच्या संतापानंतर तरी भारत गॅस एजन्सी भानावर येणार का? हा प्रश्न कायम आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading