हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ( International Cricket Stadium In Kolhapur) उभारण्यात येणार असून या मैदानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे हे स्टेडियम उभारले जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी प्रस्तावित जागेपेक्षा अधिकची जागा अजितदादांच्या सूचनेनुसारच दिली गेल्यानं या स्टेडियमला अजितदादांच (Ajit Pawar) नाव दिले जाणार आहे.
नुकतंच राज्य सरकारने विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी १२.७६ हेक्टर सरकारी जमीन देण्यास मान्यता दिली. सप्टेंबर २०२४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमआयडीसीला विकासवाडीतील १२ हेक्टर जमीन स्टेडियम प्रकल्पासाठी डीनोटिफाय करण्याचे निर्देश दिले होते. एमआयडीसीकडे या परिसरात एकूण ४२१ हेक्टर जमीन आहे आणि अजित पवार यांनी आवश्यक असलेली जमीन राज्य क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. प्रस्तावित जागेपेक्षा अधिकची जागा अजितदादांच्या सूचनेनुसारच दिली गेल्यानं या स्टेडियमला अजितदादांच नाव दिले जाणार आहे.
यापूर्वी ८० च्या दशकात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना रंगला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना कोल्हापुरात झालेला नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम नसल्याने कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात येत नव्हते. त्यामुळे विकासवाडीत जागेसाठी पाठपुरावा सुरू होता त्याला अखेर यश आले आहे. कोल्हापुरात विकसित करण्यात येणाऱ्या या स्टेडियमच्या परिसरात मुख्य मैदानासह सराव मैदान, खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रेक्षक गॅलरी, प्रशस्त पार्किंग, माध्यम सुविधासुद्धा उपलब्ध असतील. पाणी, वीज, ड्रेनेज व्यवस्था यासह जिम आणि रेस्टॉरंटचीही सुविधा याठिकाणी मिळेल. सातारा, सांगली कराड आणि कोल्हापूरच्या क्रिकेटप्रेमींना या स्टेडियमवर जाऊन आरामात सामने पाहता येतील.
कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापासून अनेक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू होता. त्या प्रयत्नांना यश मिळालं असून या निर्णयाचे क्रीडा नगरी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी, क्रीडाप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे.