International Cricket Stadium In Kolhapur : कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार; कोणकोणत्या सुविधा मिळणार ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन International Cricket Stadium In Kolhapur । आपल्या भारतात क्रिकेटला खेळ नव्हे तर धर्म मानतात. क्रिकेटचे वेड इथल्या लोकांना इतकं आहे कि मॅच कोणतीही असो, स्टेडियम तर खचाखच भरलेली असतात. आपल्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहेत. आता यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरची भर पडणार आहे. काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी १२.७६ हेक्टर सरकारी जमीन देण्यास मान्यता दिली. त्यामुळे कोल्हापुरातील क्रिकेटप्रेमींसाठी हि अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल.

कोल्हापूर जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आणि तरुण खेळाडूंना उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही जमीन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाला मोफत देण्यात येईल. “जमीन विभागाला मिळाल्यानंतर, ती कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) ला देण्याचा करार केला जाईल,” असे स्थानिक भाजप सदस्याने सरकारी नियम आणि धोरणाचा हवाला देत सांगितले. ही जमीन मंजूर केलेल्या उद्देशानेच वापरली पाहिजे. “सरकारने स्पष्ट केले आहे की क्रीडांगण किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बांधण्यासाठी विभागामार्फत केडीसीएला कोणताही निधी दिला जाणार नाही,” असे भाजप सदस्याने सांगितले.

कोल्हापुरात विकसित करण्यात येणाऱ्या मैदान परिसरात मुख्य मैदानासह सराव मैदान, खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रेक्षक गॅलरी, प्रशस्त पार्किंग, माध्यम सुविधासुद्धा उपलब्ध असतील. पाणी, वीज, ड्रेनेज व्यवस्था यासह जिम आणि रेस्टॉरंटचीही सुविधा याठिकाणी मिळेल. सातारा, सांगली कराड आणि कोल्हापूरच्या क्रिकेटप्रेमींना या स्टेडियमवर जाऊन आरामात सामने पाहता येतील.

कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि म्हटले की, “कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना यश आले आहे. मी महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात हे स्टेडियम बांधले जाईल याचा मला आनंद आहे.” कोल्हापूरच्या क्रिकेट इतिहासाची आठवण करून देताना महाडिक म्हणाले की, १९८० च्या दशकात छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना या शहरात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला होता.

जवळजवळ चार दशकांनंतर, कोल्हापूरला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधी मिळेल. प्रस्तावित स्टेडियमसाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर मैदानाचे काम सुरू होईल,” असे महाडिक यांनी म्हंटले. सप्टेंबर २०२४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमआयडीसीला विकासवाडीतील १२ हेक्टर जमीन स्टेडियम प्रकल्पासाठी डीनोटिफाय करण्याचे निर्देश दिले होते. एमआयडीसीकडे या परिसरात एकूण ४२१ हेक्टर जमीन आहे आणि अजित पवार यांनी आवश्यक असलेली जमीन राज्य क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते, जे नंतर केडीसीएसोबत कराराला औपचारिक स्वरूप देणार होते.

Leave a Comment

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading