Karad News : कराड तालुक्यात पेट्रोलचा तुटवडा? पंपाबाहेरील गर्दीचं खरं कारण समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Karad News | काल रात्री आणि आज सकाळी कराड तालुक्यातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर गाड्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. देशातील पेट्रोल संपत आलं आहे, त्यामुळे आत्ताच टाक्या भरून घ्या अशी कुजबुज दुचाकीस्वरांमध्ये सुरु झाली, फक्त कराड शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील सुद्धा अनेक पेट्रोल पंपावर गाड्या खचाखच भरू लागल्या.

इराण- इस्राईल युद्धामुळे आधीच देशात गॅस सिलेंडरची टंचाई आहे, त्यात आता पेट्रोलचा (Petrol News Karad) सुद्धा तुटवडा निर्माण झाला तर करायचं तरी काय अशा भीतीपोटी शेकडो गाड्या प्रत्येक पेट्रोल पंपावर रांगा लावून उभ्या आहेत, अजूनही हि गर्दी अशीच कायम आहे. या पार्श्वभूमीवर हॅलो महाराष्ट्राची टीम थेट पेट्रोल पंपावर पोहचली आणि सत्य- असत्य नेमकं काय आहे? याची पडताळणी केली.

यावेळी कराड शहरातील एका प्रसिद्ध पेट्रोल पंपावरील मॅनेजर यांनी सांगितलं कि, पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा सध्या तरी नाही. आत्ता आमच्याकडे पेट्रोलचा भरपूर प्रमाणात साठा आहे, ज्यामुळे अनेक दिवस आपल्याला कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. आमच्या कडे नियमित पुरवठा नेहमीप्रमाणे सुरु आहे. पेट्रोल मिळणारच नाही अशा प्रकारचा कोणताही आदेश आम्हाला सरकार कडून आलेला नाही. परंतु लोकांमध्येच अफवा पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले, संभ्रम निर्माण झाला आणि त्याचमुळे मोठ्या संख्येने लोक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. या एकूण परिस्थितीमुळे आधी पेक्षा दुप्पट पेट्रोल विक्री होतेय. मात्र पेट्रोल संपेल अशी परिस्थिती सध्या तरी अजिबात नाही, त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये.

दरम्यान, जे कराड मध्ये घडलं तेच चित्र काल कोल्हापुरात सुद्धा पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने दुचाकी गाड्या पेट्रोल पंपावर रांगा लावून बसल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन करत म्हंटल कि, पेट्रोल आणि डिझेलचा साठा पूर्ण आपल्या देशभरामध्ये, आपल्या राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये साठा आहे. दररोजचा पेट्रोल सप्लाय नियमितपणे सुरु आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. पेट्रोल पंपावरती गर्दी केल्यामुळे इतर नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण होते आणि पेट्रोल पंप चालकांना सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आवश्यकता असेल तरच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती जावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading