मुंबईसाठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन!! पायाभूत सुविधा अन बरंच काही

Mumbai News : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकासाचे प्रकल्प राबवले गेले आहेत. वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि मर्यादित जमीन या आव्हानांना सामोरे जात असताना रस्ते, पूल, मेट्रो, विमानतळ आणि नागरी पुनर्विकास यांसारख्या क्षेत्रांत विविध योजना अमलात आणण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या ‘मुंबई ट्रान्सफॉर्मेशन’ या धोरणाने मुंबईचा मोठा कायापालट होताना दिसतोय.

वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सागरी सेतू, कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्यात आली. मुंबई–नवी मुंबई सागरी सेतूमुळे महानगरातील दोन महत्त्वाच्या भागांमधील प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील कोस्टल रोड प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत असून, पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. मेट्रो मार्गांच्या विस्तारामुळे उपनगरांना शहराच्या मुख्य भागांशी जोडणारी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होत आहे. हवाई वाहतुकीच्या वाढत्या गरजा लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे केवळ हवाई प्रवासाची क्षमता वाढणार नाही, तर नवी मुंबई आणि लगतच्या परिसराचा आर्थिक व औद्योगिक विकासही वेगाने होण्याची अपेक्षा आहे.

नागरी पुनर्विकासाच्या दृष्टीने धारावी पुनर्विकास, बीडीडी चाळींचा पुनर्वसन प्रकल्प आणि झोपडपट्टी सुधारणा योजनांवर काम सुरू आहे. या माध्यमातून रहिवाशांना सुरक्षित निवास, मूलभूत सुविधा आणि नियोजित शहरी रचना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कायापालट करण्याचे स्वप्न फडणवीसांनी पाहिले आणि त्याला कायदेशीर व आर्थिक स्वरूप दिले. या पुनर्विकास प्रकल्पामुळे तिथल्या रहिवाशांना हक्काचे घर आणि रोजगाराची नवीन साधने मिळणार आहेत. तसेच जलवाहतूक सेवा, वॉटर टॅक्सी आणि रो-रो फेरीमुळे मुंबई–नवी मुंबई व किनारपट्टी भागांतील प्रवासाला पर्याय उपलब्ध होत आहे.

एकूणच, विविध पायाभूत, आर्थिक आणि सामाजिक प्रकल्पांमुळे मुंबईचा चेहरा बदलत असून, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शहराला अधिक सक्षम बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. हि सर्व कामे आम्हीच केली आणि इथून पुढेही आम्हीच करू असं महायुतीकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading