सध्या संपूर्ण देशात मुंबई महापालिका निवडणुकीचीच जोरदार चर्चा बघायला मिळत आहे. यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ऐतिहासिक मानली जातेय. एकीकडे भाजप आणि शिंदे गट यांची महायुती, दुसरीकडे प्रथमच एकत्र आलेले ठाकरे बंधु आणि तिसरीकडे काँग्रेस- वंचीतची आघाडी असा तिरंगी सामना मुंबईत होताना दिसतोय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूनी आपला मराठा कार्ड बाहेर काढलं आहे. मुंबईची निवडणूक हि मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक असल्याचे सांगत ठाकरेंनी मतदारांना भावनिक आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या प्रचाराला टॅकल करण्यासाठी आम्हीही मुंबईत मराठी महापौर बसवू असं भाजपने सांगून टाकलं आहे. मात्र मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्दयावरून मुंबईचे राजकारण पेटलं असताना भाजपच्या एका नेत्याने मुंबईबाबत वादग्रस्त विधान करत भाजपला अडचणीत आणलं आहे.
कोणी केलं वादग्रस्त विधान ?
मुंबईबाबत वादग्रस्त विधान केलं आहे ते भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी … तामिळनाडू भाजपचे ते मुख्य नेते आहेत. मुंबईतील दक्षिण भारतीय लोकांचे मते आपल्याकडं खेचण्यासाठी भाजपने के अण्णामलाई यांना प्रचारात उतरवले आहे. त्यावेळी प्रभाग क्रमांक 47 मध्ये प्रचार करताना अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला, यावर सुद्धा हद्द म्हणजे बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं अकलेचे तारेही त्यांनी तोडले. मुंबई हि महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे असं अण्णामलाई म्हणाले. मुंबई महापालिकेचे बजेट 75 हजार कोटीं आहे. ही काही लहान रक्कम नाही. चेन्नईचं बजेट 8 हजार कोटी रुपये आहे. तर बंगळुरूचं बजेट 19 हजार कोटी रुपये आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
अण्णामलाई मुळे भाजप अडचणीत
एकीकडे आधीच भाजप हा मराठी माणसाच्या विरोधातील पक्ष असल्याचा प्रचार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केला आहे. ठाकरे बंधूंच्या प्रचाराला मुंबईकरांची मोठी साथ मिळताना दिसतेय. मराठी माणसाच्या रक्षणासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील मराठी मतदारांमध्येही मोठा उत्साह आलाय. मराठी माणसाच्या मुद्द्यावर बोलताना भाजप नेते अजूनही अडखळत आहेत. त्यातच आता के अण्णामलाई यांनी मुंबई हि महाराष्ट्राचे शहरच नाही असं विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपची मराठी विरोधी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांच्या हाती आयत कोलीत मिळालं आहे. के अण्णामलाई यांच्या विधानावर ठाकरे बंधू कोणत्या शब्दात समाचार घेतात ते पाहायला हवं.