हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Pune Expressway । मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. खंडाळा बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दोन्ही दिशेने अतिशय हळू हळू वाहने पुढे सरकत आहेत. वाहतूक कोंडी हि दोन्ही बाजूनी असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. यापूर्वी आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपीलीन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे जवळपास दीड दिवस वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पुढच्याच आठवड्यातील हि दुसरी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
आज गुरुवारी शिवजयंतीनिमित्त अनेकांना सुट्टी आहे. उद्याचा शुक्रवार आणि त्यानंतर लगेच शनिवार- रविवारचा विकेंड असलयाने अनेकजण फिरायला घराबाहेर पडले आहेत. त्यामुळेच मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर भलीमोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. बोगद्याच्या जवळच वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच अतिरिक्त वेळही वाया जात आहेत. याबाबत सोशल मीडियावर काही विडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओंनुसार, एक्सप्रेस वेच्या मुंबई बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या असून प्रवासी त्यांच्या वाहनांमधून उतरून एक्सप्रेसवे वर उभे असल्याचं चित्र दिसतंय.
Over 30km traffic gridlock on the Mumbai-Pune Expressway pic.twitter.com/eoH5tZhS6a
— Gaurav Kadam (@gauraavkadam) February 4, 2026
दरम्यान, यापूर्वीच्या ३२ तासांच्या वाहतूक कोंडीनंतर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) भविष्यात अशाच परिस्थिती अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक योजना विकसित करण्याची घोषणा केली आहे. Mumbai Pune Expressway
अपघातप्रवण खंडाळा-लोणावळा घाट मार्गाला बायपास करण्यासाठी डिझाइन केलेल्या १३.३ किमीच्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. कुसगाव आणि खोपोलीला जोडणाऱ्या दोन बोगदे आणि केबल-स्टेड पूल असलेल्या या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होण्याची शक्यता आहे.