NCP Manifesto : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटाने आज संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी अजित पवारांनी पुणेकरांना खुश करणारी सर्वात मोठी घोषणा केली आहे. पुणे महापालिकेत आमची सत्ता आल्यास सर्वच्या सर्व पुणेकरांना आम्ही मेट्रो अन् PMPML बस सेवा फुकटात देऊ, प्रवाशांना मोफत प्रवास देऊ अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. पुण्यात मतदानाच्या पूर्वी दादाचा हा वादा चांगलाच गेमचेंजर ठरू शकतो अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त जाहीरनामा (NCP Manifesto) आज पुण्यातील शिवाजीनगर येथे प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, पुण्यात मोफत मेट्रो आणि बस सेवा शक्य आहे का, असा प्रश्न पुणेकरांना पडू शकतो. मात्र हे पूर्णपणे शक्य आहे. आम्ही त्याबाबत निर्णय घेतला असून लवकरच तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करु. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मोफत मेट्रो व बस प्रवास देऊन दाखवू, असा विश्वास अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.
काय आहे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात – NCP Manifesto
दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल.
रस्त्यावर खड्डा पडल्यास 72 तासांच्या आत कंत्राटदाराच्या खर्चाने तो दुरुस्त करणार. कामात उशीर झाल्यास कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात येणार.
एप्रिल २०२६ पासून सर्व मध्यमवर्गीयांच्या मालकीची ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे पूर्णपणे मालमत्ता करमुक्त करणार
सर्व प्रभागांत दररोज उच्च दाबाने पाणीपुरवठा, टँकर माफियांचे उच्चाटन, भूमिगत जलवाहिन्यांचे आधुनिकीकरण होणार
पुणे महानगरपालिका 150 पुणे मॉडेल शाळांना मंजुरी देणार ,
अतिरिक्त पाणी साठा, रस्त्यांची कालबद्ध कामे, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी स्वतंत्र एसआरए कक्ष उभारणार
विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅब्लेट दिले जातील, जेणेकरून कोणत्याही अडथळ्याशिवाय शिक्षण सुरू राहील.
लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगारासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणार