हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Modi In Mumbai । मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येतेय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक व्हीव्हीआयपी नेतेमंडळींची उपस्थिती असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद राहणार आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
उद्या 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.15 वाजता नरेंद्र मोदी मुंबईत येतील. त्यानंतर, दुपारी 2.30 वाजता नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात लोकभवन येथे द्विपक्षीय बैठक पार पडेल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांची हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंडटेबल चर्चा होईल. नंतर सायंकाळी 6.30 वाजता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रम पार पडेल. या व्हिव्हिआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच वाहतुकीत बदल करत अनेक प्रमुख रस्ते उद्या बंद करण्यात आले आहेत.
गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित भारत–फ्रान्स ‘इयर ऑफ इनोव्हेशन’ कार्यक्रमाच्या (१४ ते २२ फेब्रुवारी २०२६; मुख्य कार्यक्रम १७ फेब्रुवारी) पार्श्वभूमीवर लगतच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २. ते रात्री ९. वाजेपर्यंत खालील वाहतूक व्यवस्था लागू राहील. pic.twitter.com/3E688l9DbF
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) February 15, 2026
दक्षिण मुंबईतील हे मार्ग बंद राहतील
उद्या १७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक बंद असणार आहे फक्त आपत्कालीन वाहनासाठी हा मार्ग सुरु असेल.
नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पी. रामचंदानी मार्गदेखील वाहतूकीसाठी बंद असेल.
रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड, बीके बोमन बेहराम रोडकडे वळवण्यात आले आहे.
पी. रामचंदानी मार्गावरील वाहतूक अल्वा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड आणि जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवण्या येईल.
अॅडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बेस्ट बसचे थांबे उद्याच्या दिवस बंदच राहतील.