हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Airport : पुणेकर प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची माहिती समोर येतेय. पुणे विमानतळासह देशातील ४ विमानतळे तात्पुरत्या काळासाठी बंद होणार आहेत. नियोजित धावपट्टी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे हि विमानतळे बंद करण्यात येणार आहेत. यामध्ये पुण्यासह जोधपूर, श्रीनगर, आणि आदमपूर हवाई तळाचा समावेश आहे. या ४ विमानतळांच्या धावपट्ट्या नूतनीकरणासाठी वेगवेगळ्या वेळी बंद राहतील, ज्यामुळे नागरी विमान वाहतुकीत तात्पुरता व्यत्यय येईल.
विमानतळ देखभालीचे काम महिन्याच्या अखेरीपासून टप्प्याटप्प्याने केले जाईल. अधिकाऱ्यांनी काही विमानतळे बंद ठेवण्यासाठी ‘नोटॅम’ (NOTAMs) म्हणजेच वैमानिकांसाठी सूचना आधीच जारी केल्या आहेत, तर सरकारच्या ‘स्लॉट कोऑर्डिनेशन’ प्रक्रियेद्वारे विमान कंपन्यांना खूप आधीच माहिती देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार जोधपूर विमानतळ येत्या 29 मार्च ते 27 एप्रिल या काळात साधारण एका महिन्यासाठी बंद असेल. त्यानुसार,इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांसारख्या विमान कंपन्यांनी २८ मार्चनंतरच्या विमानांसाठीचे बुकिंग आधीच स्थगित केले आहेत.
श्रीनगर विमानतळा ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत ते शनिवार-रविवारी बंद राहण्याची शक्यता आहे, त्यानंतर १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत ते पूर्णपणे बंद राहील.
पुणे विमानतळाच्या (Pune Airport) धावपट्टीचे नूतनीकरण देखील नियोजित आहे, मात्र याबाबतच्या नेमक्या तारखा अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्यावेळी पुणे विमानतळ कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत बंद होईल याच्या तारखा समोर येतील त्यावेळी प्रवाशांना व्यत्ययांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पंजाबमधील आदमपूर हवाई तळ सर्वात जास्त काळ बंद राहण्याची शक्यता आहे, आणि अहवालानुसार ते वर्षाच्या अखेरीस आठ महिन्यांपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. लढाऊ विमाने आणि लष्करी विमानांसाठी अधिक तांत्रिक आवश्यकता असल्याने, अशा विमानतळांवर नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. हे विमानतळ पाकिस्तानच्या सीमेनजीक असल्याने त्याचे सामरिक महत्त्व आणखी वाढते. या चारही विमानतळांवरील रनवेवर फायटर जेट तसेच अन्य संरक्षणविषयक उड्डाणे होतात.