Pune News : पुण्यातील ‘या’ शाळा 23 जानेवारीला दुपारी 12 नंतर बंद राहणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी आणि खास करून पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील काही शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ नंतर बंद राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ च्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) हद्दीतील स्पर्धेच्या मार्गावर असलेल्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ नंतर बंद राहतील. विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी.

चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आला असून त्याचे एकूण 58 कि.मी अंतर आहे. चौथ्या टप्प्यांतर्गत, सायकल शर्यत बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधून सुरू होईल, पुणे शहरात प्रवेश करेल आणि त्यानंतर राजीव गांधी पुलावरून पुन्हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करेल. हा मार्ग सांगवी, वाकड, निगडी, त्रिवेणी नगर, भोसरी, चिखली, पिंपरी-काळेवाडी भागातून जाईल आणि त्यानंतर पुन्हा राजीव गांधी पुलावरून पुणे शहरात प्रवेश करेल. ही शर्यत सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावी आणि नागरिकांना कोणता त्रास होऊ नये, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी, शर्यतीच्या मार्गावर असलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणी नगर, चिंचवड एमआयडीसी, चिखली, काळेवाडी, भोसरी एमआयडीसी, यशवंत नगर पिंपरी आणि त्रिवेणी नगर या भागांतील शर्यतीच्या मार्गावर असलेल्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना हा बंदचा आदेश लागू आहे. अधिकृत निर्देशानुसार, या सर्व शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ नंतर बंद राहतील.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading