Rajmata Jijau Buses : ST च्या ताफ्यात राजमाता जिजाऊ बस!! प्रवाशांना मोठा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rajmata Jijau Buses । सर्वसामान्य माणसाला आपल्या हक्काची गाडी वाटणाऱ्या एसटी बसच्या ताफ्यात आता नवीन बसची भर पडली आहे. राजमाता जिजाऊ बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असून प्रवाशांना या अत्याधुनिक बसचा मोठा फायदा होईल. ही नवीन बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची अधिकृत माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. शिवशाही आणि शिवनेरीनंतर आता एसटीची राजमाता जिजाऊ बस प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देईल. इतिहासाचा सन्मान आणि आधुनिक सुविधांचा मेळ साधत या बसेस लवकरच महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना म्हंटल कि, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभ्या राहिलेल्या राजमाता जिजाऊ या प्रेरणास्थान आहेत. त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी आहेत. त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या या नव्या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण करण्यात आले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील एसटी बसला शिवनेरी, शिवशाही, शिवाई आणि हिरकणी यांसारख्या ऐतिहासिक नावे देण्यात आली होती. आता याच धर्तीवर नवीन बस ला ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यात आलं आहे.

कशी असेल राजमाता जिजाऊ बस – Rajmata Jijau Buses

राजमाता जिजाऊ बसचा रंग भगवा आणि पांढरा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन तुम्हाला या बसकडे पाहून दिसेल. सध्या एसटीच्या ताफ्यातील बहुतांश बसची आसन क्षमता ४० इतकी आहे. मात्र, नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसून प्रवास करू शकतील. या बसमध्ये 3 बाय 2 अशा पद्धतीची आसन रचना असेल. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने हि राजमाता जिजाऊ बस उपयुक्त ठरेल. राजमाता जिजाऊ नावाच्या या आधुनिक बसमध्ये आरामदायी आसनांसह आपात्कालीन दरवाजा, अग्निशमन यंत्रणा आणि प्रवाशांच्या सामानासाठी प्रशस्त डिक्कीची सोय करण्यात आली आहे. केवळ नावच नाही, तर आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या बस प्रवाशांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. हि नवीन राजमाता जिजाऊ बस मार्च महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत येईल असं बोललं जात आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात हि बस दाखल होईल.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading