महाराष्ट्रातील पहिले जातिमुक्त गाव!! समाजापुढे नवा आदर्श

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महाराष्ट्रात अनेकजण जातीपातीच्या विळख्यात अडकले असताना याच महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्यातील एका गावाला जातिमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. सौंदला असं या गावाचे नाव असून ग्रामसभेने स्वतःला “जातमुक्त” घोषित करणारा ऐतिहासिक ठराव मंजूर केला. रहिवासी आता त्यांच्या नावापुढे जात दर्शविणारी आडनाव वापरणार नाहीत. ५ फेब्रुवारी रोजी गावप्रमुख शरद बाबुराव अरगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “विशेष ग्रामसभे” बैठकीत हा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे उद्दिष्ट बंधुता मजबूत करणे, सामाजिक दरी कमी करणे आणि इतर गावांसाठी एक आदर्श निर्माण करणे आहे.

उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने असा ठराव मंजूर केला की गावातील कोणत्याही सरकारी किंवा बिगरसरकारी सामाजिक कार्यक्रमात यापुढे जातीचा उल्लेख केला जाणार नाही. जातीव्यवस्था केवळ समाजात फूट पाडण्याचे काम करते, अशावेळी जर आपल्याला विकास पाहिजे असेल तर नागरिकांमध्ये एकी असणे गरजेची आहे असं ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळेच गावातील सुशिक्षित तरुणांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला होता. एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याने स्पष्ट केले की, “आम्हाला अनेकदा असे आढळून आले की निवडणूक असो किंवा सामाजिक कार्यक्रम, जातीचा मुद्दा नेहमीच उपस्थित होत असे. आम्हाला खरी प्रगती हवी असेल तर ही जुनी बंधने तोडावी लागतील असे आम्ही ठरवले. हळूहळू, तरुणांनी वडीलधाऱ्या माणसांना हि गोष्ट पटवून दिली आणि आज संपूर्ण गावाने ते मान्य केले आहे.”

ग्रामसभेच्या ठरावानुसार, गावातील मुलांना आता शाळेत नोंदणी करताना जातीवर आधारित आडनावाऐवजी फक्त त्यांच्या वडिलांचे नाव किंवा “भारतीय” हा शब्द वापरण्यास प्रोत्साहित केले जाईल. आता कोणत्याही गावातील उत्सवासाठी स्वतंत्र गटांऐवजी “पंगत” (सामुदायिक मेजवानी) असेल. गावातील मंदिरे आणि विहिरींवर कोणताही विशिष्ट समूह वर्चस्व गाजवू शकणार नाही; त्याऐवजी, प्रत्येक गावकरी त्यांचा समान वापर करेल. जिल्हाधिकाऱ्यांनी सौंदला ग्रामसभेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि याला “खरी लोकशाही” म्हटले. त्यांनी म्हंटल की प्रशासन या गावाला “आदर्श गाव” म्हणून विकसित करण्यासाठी विशेष अनुदान देण्याचा विचार करत आहे.

गावचे सरपंच अरगडे म्हणाले की, “जातमुक्त गाव” या शीर्षकाचा ठराव जाती-आधारित भेदभाव दूर करण्याच्या आणि समाजातील एकता वाढवण्याच्या गरजेवर भर देतो. गावकऱ्यांना सामाजिक एकात्मता आणि जातीचा विचार न करता सर्वांना समान वागणूक देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी सरपंचानी केलं. त्यांनी पुढे सांगितले की, जातीय भेदभावाचे विष ग्रामीण भागात खोलवर रुजले आहे. “आम्हाला ते आमच्या गावात पोहोचू द्यायचे नाही. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात पसरली आहे आणि आमच्या गावाने त्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.”

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading