Varandha Ghat : पुण्यातून कोकणात जाणारा हा घाट 2 महिन्यांसाठी बंद राहण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येतेय. निसर्गरम्य वरंधा घाट (Varandha Ghat) हा वाहतुकीसाठी तब्बल दोन महिन्यांपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. रस्त्याची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी महामार्ग विभागाने हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव भोर प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून, त्यावर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरडोशी आणि वरंधा घाट यांच्या दरम्यानचा रस्ता विशेषतः अरुंद आहे आणि या पट्ट्यात अनेक तीव्र व धोकादायक वळणे आहेत. सध्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, काही टप्पे यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. मात्र, हिरडोशीच्या पुढे रस्तारुंदीकरणाचे काम भौगोलिक अडचणींमुळे कठीण झाले आहे. का बाजूला देवघर धरण आहे, तर दुसऱ्या बाजूला उंच आणि तीव्र उताराचे डोंगर आहेत. त्यामुळे रस्तारुंदीकरणाच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. अशा परिस्थितीत बांधकामादरम्यान वाहतूक सुरू ठेवल्यास प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्याचे कंत्राटदाराचे उद्दिष्ट आहे. वनजमिनीच्या वापराशी संबंधित मंजुरीचे प्रस्तावही सादर करण्यात आले असून, त्यांना लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत रस्त्याचे काम हे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी हा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हंटल आहे.

याबाबत सध्या प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहेत. भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाला या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालांतील निष्कर्षांच्या आधारे जिल्हा प्रशासन अंतिम निर्णय घेईल. जर वरंधा घाट हा २ महिन्यासाठी बंद ठेवण्यात आला तर प्रवाशाना पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाट किंवा पोलादपूरमार्गे अशा पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. मात्र या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांचा जास्तीचा वेळ जाण्याची सुद्धा शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading