Vasota Fort : वासोटा किल्ल्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vasota Fort | सातारा जिल्हयातील कोयना वन्यजीव अभयारण्यत वसलेला वासोटा किल्ला हा पर्यटकांचे खास आकर्षण राहिला आहे. घनदाट जंगल, उंच डोंगर आणि शांत वातावरणामुळे वासोटा किल्ला ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे. फक्त सातारा जिल्हयातीलच नव्हे तर इतर ठिकाणाहूनही हजारो ट्रेकर्स वासोटा किल्ल्यावर येत असतात. आता या वासोटा किल्ल्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वासोटा किल्ल्यावर आता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेलिंगची खास सोय होणार आहे.

खास करून ज्याठिकाणी खोल दऱ्या आहेत, त्या दऱ्यांच्या कडांवर लोखंडी रेलिंग बसवण्याचे काम जलद गतीने सुरु आहे. यासाठी कामगारांकडून डोक्यावरून गडावर साहित्य पोहोचवले जात आहे, वनविभागाच्या साहाय्याने हे काम सुरु आहे. मजबूत आणि पक्क्या रेलिंगमुळे किल्ल्याचे ऐतिहासिक सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यटकांनाही कोणतीही अडचण पडणार नाही.

वासोटा किल्ल्यावर (Vasota Fort) पोहोचण्यासाठी पर्यटकांना प्रथम बामणोली येथे जावे लागते. तेथून शिवसागर जलाशयातून बोटीने प्रवास करून पुढे जंगलातून ट्रेक करत किल्ल्यावर पोहोचता येते. घनदाट अरण्यातून किल्ल्यावर चढताना तब्बल २ तास लागतात. सुटीच्या दिवशी सामन्यता ३००० ते ४००० पर्यटक वासोटा किल्ल्याला भेट देत असतात.

वासोटा किल्ल्याचा ट्रेक मध्यम अवघड मानला जातो. ट्रेक दरम्यान दाट जंगल, वन्यजीवांचा अधिवास आणि नैसर्गिक शांतता अनुभवायला मिळते.किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाचे रूप विलक्षण ठरते. मात्र दुसरीकडे, उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. अनेकांना भीतीही वाटते.
गडाच्या तिन्ही बाजूने असलेले धोकादायक कडे डोळ्यांचे पारणे फेडतात. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आता दऱ्यांच्या कडांवर रेलिंगची खास सोय होणार आहे. या नव्या सुविधेमुळे पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. तसेच अपघाताची चिंता मिटणार आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading