हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेमात कधी कोणाचा गेम होईल ते सांगता येत नाही असं म्हणतात तेच खरं.. असाच एका प्रेमाचा रक्तरंजित शेवट झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घडली आहे. एका महिलेने रागाच्या भरात आपल्याच प्रियकराची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली आहे. प्रियकर संशय घेत असल्याने प्रेयसीने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत कराड पोलिसांनी सदर आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर आरोपी महिलेचे नाव सारिका चंद्रकांत कोळी (रा. इगवले वस्ती, आगाशिवनगर) असं आहे तर राजेंद्र मरीआप्पा काळे (वय ४५, रा. शिवाजी स्टेडियमच्या पाठीमागे, कराड) असं मृत प्रियकराचे नाव आहे. राजेंद्र आणि सारिका यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. परंतु मागील काही दिवसापासून त्यांच्या नात्यात दरी पडली होती. मुख्य म्हणजे सारिकाच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी सातत्याने पडत होती.
मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हा सारिकाच्या घरी होता. याच दरम्यान, राजेंद्रने पुन्हा एकदा सारिकाच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि इथेच सारिकाचे मस्तक फिरले. सातत्याने राजेंद्र संशय घेत असल्याने सारिकाला राग अनावर झाला आणि भर रात्रीच दोघात कडाक्याचे भांडण झालं. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झालं आणि रागाच्या भरात सारिकाने घरातील कुऱ्हाडीने राजेंद्रवर हल्ला केला.. सारिकाने सापासप वार करत राजेंद्रचा निर्घृण खून केला. राजेंद्रची हत्या करताच ती स्वतःच पोलिसांच्या स्वाधीन झाली. आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.
या घटनेनंतर डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला. आरोपी महिला सारिकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे