हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आधार मिळावा, त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी केंद्र सरकार सतत नवनवीन निर्णय घेत असते. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्याना खुश करणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ दिली आहे. अटल पेन्शन योजना (APY) २०३०-३१ पर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे लाखो गरीब आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळत राहील.
म्हातारपणात आर्थिक सुरक्षा मिळावी. खास करून कष्टकरी माणसाला आणि खेड्यात राहणाऱ्या लोकांना म्हातारपणात याच गोष्टीचा आधार मिळेल. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने हि योजना ९ मे २०१५ रोजी सुरू केली आहे. जानेवारी २०२६ पर्यंत, ८६.६ दशलक्षाहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आता या योजनेला आणखी मुदतवाढ मिळाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की सरकार जागरूकता वाढवण्यासाठी, लोकांना त्याबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी या योजनेला पाठिंबा देत राहील.
अटल पेन्शन योजनेमुळे ज्या कामगारांकडे निवृत्तीनंतर कोणतीही पेन्शन व्यवस्था नाही त्यांना ६० वर्षांच्या वयानंतर दरमहा १,००० ते ५,००० रुपये हमी पेन्शन मिळेल. १८ ते ४० वयोगटातील सर्व भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ६० वर्षांच्या वयानंतर, दर महिन्याला १,०००, २,०००, ३,०००, ४,००० किंवा ५,००० पेन्शन या योजनेच्या माध्यमातून मिळते. पेन्शनची रक्कम लाभार्थ्याच्या योगदानावर अवलंबून असते. समजा 60 वर्षाच्या आधीच ग्राहकाचा मृत्यू झालाच तर अशावेळी उर्वरित रक्कम त्या व्यक्तीचा जोडीदार अटल पेन्शन योजनेच्या खात्यात रक्कम टाकू शकतो. ग्राहक मासिक, तिमाही किंवा अर्ध-वार्षिक आधारे अटल पेन्शन योजनेत रक्कम जमा करु शकतो.