हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bank Holidays । बँकेत जर तुमची काही महत्वाची कामे असतील तर आधी हि बातमी वाचा. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारतातील बँक ग्राहकांना गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. कारण बँका सलग चार दिवस बंद (Bank Holidays) राहण्याची शक्यता आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संप आयोजित केली आहे, ज्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याची मागणी केली आहे.
आधीच या महिन्याच्या अखेर २४ जानेवारी रोजी महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. २५ जानेवारी ला रविवार असल्याने देशभरातील बँक बंद असतील. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन असल्याने राष्ट्रीय सुट्टी आहे. त्यानंतर २७ जानेवारीला बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे. त्यामुळे २४ जानेवारी ते २७ जानेवारीपर्यंत बँका बंद राहू शकतात. ग्राहक सलग चार दिवस बँकेच्या शाखांना भेट देऊ शकणार नाहीत. याचा रोख व्यवहार, धन हस्तांतरण, हप्ते भरणे व अन्य तातडीच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो.
ग्राहकांनी काय करावे? Bank Holidays
बँक शाखा बंद राहणार असल्याने ग्राहकांनी आपली बँकिंग कामे आधीच उरकून घ्यावी.
मोठे आर्थिक व्यवहार किंवा रोख व्यवहार संपाच्या आधी पूर्ण करा.
UPI, इंटरनेट बँकिंग, ATM सारख्या डिजिटल सेवा सुरू राहतील, पण शाखा-आधारित व्यवहार प्रभावित होऊ शकतात.
बँक कर्मचाऱ्यांचा संप कशासाठी ?
बँक कर्मचारी बऱ्याच काळापासून पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची मागणी करत आहेत. बँकांनी बहुतेक केंद्र सरकारी कार्यालये आणि वित्तीय संस्थांप्रमाणेच सोमवार ते शुक्रवार असे कामाचे स्वरूप ठेवावे अशी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने सांगितले की, मार्च २०२४ मध्ये वेतनवाढीच्या वाटाघाटीदरम्यान या विषयावर चर्चा झाली होती. परंतु अजूनही हा करार लागू झालेला नाही. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. बँक संघटनांचे म्हणणे आहे की, पाच दिवसांचा आठवडा कर्मचारी ताण कमी करेल, कार्यक्षमता वाढवेल, आणि कुटुंबासोबत वेळ देण्याची संधी यामुळे मिळेल. दीर्घकाळात या बदलामुळे बँकिंग सेवांचा दर्जा टिकेल, असे त्यांचे मत आहे. तर दुसरीकडे UFBU ने सुचवले आहे की, ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून सोमवार ते शुक्रवार दररोज ४० मिनिटे अतिरिक्त काम करावे, ज्यामुळे शाखा शनिवारी बंद ठेवता येऊ शकतील.