हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रुपयांचा आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर मागील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार याकडे महिलावर्गाचे लक्ष्य लागलं होत, मात्र आता याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून 98 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तो महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागानं 98.45 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. याबाबतचा शासन निर्णय 18 फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे. यापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे आता जानेवारी महिन्यातील प्रलंबित हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो.
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता लागली होती. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता देताना थोडं मागे पुढे झालं होते. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर 2025 च्या शेवटच्या आणि जानेवारी 2026 च्या सुरुवातीच्या काही दिवसात देण्यात आला होता. यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. आता सामाजिक न्याय विभागानं लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 98.45 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्यानं महिलांना कोणत्याही क्षणी १५०० रुपये मिळू शकतात.