हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन LPG Gas Cylinder Price Hike । मध्य पूर्वेतील इराण विरुद्ध इस्राईल युद्धाचा फटका भारताला सुद्धा बसत असून याच पार्श्वभूमीवर देशांतर्गत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती महागल्या आहेत. यापूर्वी फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या, मात्र आता घरगुती गॅसच्या किमतीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. तब्बल ६० रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे. इंडियन ऑइल कंपनीच्या वेबसाइटवर आजपासून नवीन दर यादी अपडेट करण्यात आली. भारतात सर्वाधिक गॅस हा मध्यपूर्वेतून येतो. मात्र मध्यपूर्वेत सुरु असलेलं युद्ध आणि इराणने हारमून सामुद्रधुनी बंद केल्याने भारताला मोठा फटका बसला आहे.
यापूर्वी, ८ एप्रिल २०२५ रोजी घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढली (LPG Gas Cylinder Price Hike) होती. त्यानंतर आता तब्बल १० महिन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती महागल्या आहेत. आजपासून १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६० रुपये जास्त असेल. नवीन दर लागू झाल्यानंतर, दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ₹८७९ ऐवजी ₹९३९ असेल. मुंबईत त्याची किंमत ₹८५२ वरून ₹९१२ वर पोहचली. चेन्नईमध्ये त्याची किंमत ₹८६८ वरून ₹९२८ रुपयांवर गेला आहे. युद्ध असच सुरु राहिले तर परिस्थिती आणखी बिकट आणि गंभीर होऊ शकते. गॅसचा मोठा तुटवडा होऊ शकतो. सध्या केंद्र सरकारकडे ३० दिवसांचा गॅस सिलेंडरचा साठा शिल्लक आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ– LPG Gas Cylinder Price Hike
दुसरीकडे १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर ११५ च्या वाढीव किमतीत उपलब्ध होईल. नवीन दर लागू झाल्यानंतर, दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,७६८ रुपयांवरून १,८८३ रुपये झाली आहे. यापूर्वी, १ मार्च २०२६ रोजी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३१ रुपयांनी वाढ झाली होती. त्याच्या सुद्धा आधी जुलै २०२५ पासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार होत होते, परंतु आजच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. नव्या किमतीनुसार, कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर १८७५ रुपयांऐवजी १९९१ रुपयांना उपलब्ध असेल. मुंबईत १७२० रुपयांऐवजी १८३५ रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर १९२९ रुपयांऐवजी २०४३ रुपयांना उपलब्ध असेल