हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Repo Rate । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) त्यांच्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो रेटबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आरबीआय कडून रेपो रेट मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आधीप्रमाणेच रेपो रेट 5.25 टक्के असा कायम ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ गृहकर्ज, कार लोन आणि वैयक्तिक कर्जांसाठीच्या EMI वर सध्या कोणताही परिणाम होणार नाही. तुमचा दर महिन्याचा EMI, गृहकर्ज वाढणार सुद्धा नाही आणि कमी सुद्धा होणार नाही, आधीप्रमानेच तो कायम असेल.
पतधोरण जाहीर करताना, RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की सध्याच्या जागतिक अनिश्चितता असूनही, भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. देशातील महागाई पूर्णपणे नियंत्रणात आहे. महागाईचा दर सुमारे 4% च्या आसपास आहे, ज्यामुळे उद्योग आणि सामान्य जनतेवर कोणताही अतिरिक्त भार पडत नाही. त्यामुळेच आम्हाला रेपो दरात बदल करणे गरजेचं वाटलं नाही.
GDP वाढीचा अंदाज (Repo Rate)
RBI ने 2025-26 आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकासाचा अंदाज वाढवला आहे. हा अंदाज पूर्वी 7.3 टक्के होता, तो आता 7.4 टक्के करण्यात आला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था लवचिक आहे, देशांतर्गत मागणी आणि सेवा क्षेत्रातील निर्यात मजबूत होत आहे. येत्या काळात जीडीपी आणि महागाईसाठी एक नवीन आधार वर्ष लागू केले जाईल असेही त्यांनी सांगितले.
२०२६ चा अर्थसंकल्प गती देईल
आरबीआय गव्हर्नरांच्या मते, २०२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल. शिवाय, सेवा क्षेत्रातील निर्यात मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. एकूणच, रेपो दरातील स्थिरतेमुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे आणि वाढत्या आर्थिक वाढीला देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत मानले जात आहे. Repo Rate
रेपो रेट म्हणजे काय? Repo Rate Cut
रेपो रेट (Repo Rate) म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व्यावसायिक बँकांना अल्पकालीन निधी देण्यासाठी जो व्याजदर वापरते, तो दर. सोप्या भाषेत, बँका RBI कडून ज्या दराने पैसे घेतात, त्या दराला रेपो रेट (Repo Rate) म्हणतात. रेपो रेटचा उपयोग RBI अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी करते. जर रेपो रेट जास्त असेल तर कर्ज घेणे महागते आणि पैशांचा पुरवठा कमी होतो. तर रेपो रेट कमी झाल्यास कर्ज स्वस्त होते, पैशांचा पुरवठा वाढतो, आणि आर्थिक वाढीला चालना मिळते.