500 आणि 100 च्या नोटा बदलणार? मग जुन्या नोटांचे काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दैनंदिन व्यवहारात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 100 आणि 500 रुपयांच्या नोटाबाबत आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बनावट नोटांना आळा घालणे आणि चलनाचे आयुष्य वाढवण्यासाठी लवकरच 100 आणि 500 रुपयांच्या नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह नोटांची सिरीज बाजारात दाखल होणार आहे. अशावेळी मग सध्या वापरात असलेल्या जुन्या नोटांचे काय होणार? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे. जुन्या नोटा बंद तर होणार नाहीत ना अशीही भीती जनतेत आहे. मात्र याबाबत कसलीही चिंता करण्याची गरज नाही

सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. परंतु जुन्या १०० आणि ५०० च्या नोटा बंद होणार नाहीत. तुमच्याकडे असलेल्या सर्व जुन्या १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा (महात्मा गांधी नवीन सिरीज ) पूर्णपणे कायदेशीर आहेत. सरकारने किंवा आरबीआयने जुन्या नोटा निरुपयोगी करण्याचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. बनावट नोटा रोखण्यासाठी आरबीआय वेळोवेळी नोटांच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करते. त्यानुसार, छापल्या जाणाऱ्या नवीन नोटांचे सुरक्षा धागे आणि नंबर पॅनेल अधिक हायटेक केले आहेत. काही नवीन नोटांच्या डिझाइन आणि इंटॅग्लिओ प्रिंटिंगमध्ये किरकोळ सुधारणा केल्या आहेत जेणेकरून त्या अधिक दिवस टिकतील. नवीन नोटा लवकरच टप्प्याटप्प्याने चलनात आणल्या जातील. याबाबत नेमकी तारीख सरकार कडून जारी करण्यात आली नसली तरी बँकिंग यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे. हा बदल संपूर्ण देशभरात लागू होणार असून शहरी तसेच ग्रामीण भागातही नव्या नोटांचा वापर सुरू होईल.

लोक अनेकदा नंबर पॅनेलच्या मध्यभागी तारा (*) असलेल्या नोटांना बनावट समजतात. आरबीआयने या विषयावर स्पष्टीकरण जारी केले आहे. जर एखाद्या नोटेच्या संख्येच्या मध्यभागी तारा असेल तर ती खरी आहे. हे फक्त असे दर्शवते की नोट चुकीच्या छापलेल्या नोटेच्या जागी जारी करण्यात आली आहे. ती पूर्णपणे वैध आहे.

तुम्ही काय करावे?

तुमच्या १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेत घाई करण्याची गरज नाही. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर (rbi.org.in) सूचना येईपर्यंत “नोटा बंद होणार आहेत” अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. १०० किंवा ५०० रुपयांची नोट घेताना वर सांगितल्या प्रमाणे सुरक्षा वैशिष्ट्यांची तपासणी करा.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading