हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी माणसाच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईसह काही महापालिका निवडणूका एकत्र लढवल्या. तब्बल २० वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. ठाकरे कुटुंबही एक झालं आणि दोन्ही पक्षाची राजकीय युतीही झाली. निवडणुकीत ठाकरे बंधूंना अपेक्षित असं यश मिळालं नसले, तरी भविष्यातही दोन्ही भाऊ एकत्र राहतील असे अंदाज बांधले जात आहेत. मात्र कल्याण डोंबिवलीत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली. ठाकरेंची युती यामुळे तुटतेय कि काय? दोन्ही भाऊ पुन्हा एकमेकांपासून लांब जात आहेत का? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच आता राज ठाकरे यांच्या एका शब्दाने या सर्व चर्चाना बळ मिळाल आहे.
नेमकं काय घडलं?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं. मात्र याचवेळी राज ठाकरेंच्या एका शब्दामुळे शंकेची पाल चुकचुकली. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल असं राज ठाकरेंनी म्हंटल. यातील लवचिक शब्दाचा नेमका राजकीय अर्थ काय आहे? यावर आता चर्चा सुरु झाल्यात.
दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एकत्र निवडणूक लढली असतानाही निवडणुकीनंतर मनसेने शिंदे गटासोबत जाण्याच्या निर्णय घेतल्याने खळबळ उडाली. मात्र हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे, राज ठाकरेही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे व्यथित आहेत असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले. दुसरीकडे मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ६५ जागा जिंकता आल्या असल्या तरी दुसरीकडे मनसेची मात्र अक्षरशः वाताहत झाली. मनसेला अवघे ६ नगरसेवक निवडून आणता आले. मनसेची मते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिफ्ट झाली. परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मते मनसेकडे म्हणावी तशी वळाली नाहीत असं बोललं जात आहे. त्याचा फटका मनसेला बसला.