WhatsApp साठी मोजावे लागणार पैसे!! सर्वसामान्यांच्या खिशाला चाप??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या घडीला व्हॉट्सॲप हे केवळ अ‍ॅप न राहता सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप असतोच. फोटो, व्हिडिओ, मेसेज, कॉल—सगळं काही एका क्लिकवर मोफत उपलब्ध असल्यामुळे कोट्यवधी लोक व्हॉट्सॲपवर अवलंबून आहेत. मात्र आता हाच मोफत व्हॉट्सॲप लवकरच खिशाला चाप देणारा ठरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण व्हॉट्सॲप वापरण्यासाठी भविष्यात पैसे मोजावे लागू शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे देशातील करोडो युजर्समध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Meta चा नवा डाव? सबस्क्रिप्शन प्लॅनची तयारी

व्हॉट्सॲपची मालक कंपनी Meta आता व्हॉट्सॲपसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे. सध्या हा प्लॅन प्रामुख्याने व्हॉट्सॲप बिझनेस युजर्ससाठी असणार असल्याचे सांगितले जात आहे. व्यवसायांना अधिक डिव्हाइस जोडण्याची सुविधा, प्रगत मॅनेजमेंट टूल्स आणि अतिरिक्त फीचर्ससाठी शुल्क आकारले जाणार आहे. सध्या तरी सामान्य युजर्ससाठी व्हॉट्सॲप मोफत राहणार असले तरी भविष्यात जाहिरातीमुक्त अनुभवासाठी सर्वसामान्यांनाही पैसे मोजावे लागू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच आज मोफत वापरला जाणारा व्हॉट्सॲप उद्या पैसे न दिल्यास मर्यादित होणार? असा सवाल उपस्थित होतो आहे.

आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा निर्णय आणखी एक आर्थिक ओझं ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, मजूर, महिला हे सगळे WhatsAppवर अवलंबून आहेत. सरकारी योजना, शाळेचे नोटिस, आरोग्यविषयक माहिती याच माध्यमातून मिळते. अशा वेळी WhatsApp साठी पैसे आकारले गेले, तर हा थेट गरीब आणि मध्यमवर्गावर अन्याय ठरणार, अशी तीव्र भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading