महाराष्ट्रातील प्रत्येक खेळाडूला न्याय, संधी आणि हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना क्रीडा सेना आता राज्यभर आपले संघटन अधिक सक्षम आणि व्यापक स्वरूपात उभारणार असल्याची घोषणा क्रीडा सेनेचे अध्यक्ष तथा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केली आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना योग्य सुविधा, प्रशिक्षण, स्पर्धा आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी अभियान राबवले जाणार असून, प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यापर्यंत क्रीडा सेनेचे मजबूत संघटन उभे करण्यावर भर दिला जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर पै. चंद्रहार पाटील यांनी मुंबई येथे शिवसेना क्रीडा सेनेचे मार्गदर्शक आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील क्रीडा क्षेत्रासमोरील विविध प्रश्न, क्रीडा सेनेची आगामी दिशा, संघटनात्मक विस्तार आणि खेळाडूंसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य क्रीडा धोरण समितीचे सदस्य अविनाश ओंबासे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत राज्यस्तरीय कोअर कमिटीची स्थापना, जिल्हा व तालुका स्तरावर कार्यकारिण्यांची उभारणी, सदस्य नोंदणी अभियान, खेळाडू संवाद मेळावे, क्रीडा महोत्सव आणि राज्यभर दौरा आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याशिवाय विविध क्रीडा संघटना, प्रशिक्षक, माजी खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना एकत्र आणून राज्यात सक्षम क्रीडा नेटवर्क उभारण्यावरही भर देण्यात आला.
यावेळी बोलताना पै. चंद्रहार पाटील म्हणाले, “मी स्वतः मातीच्या आखाड्यातून घडलेला खेळाडू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याची मला पूर्ण जाणीव आहे. अनेक खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असते, पण योग्य प्रशिक्षण, आर्थिक मदत, स्पर्धा आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांची स्वप्ने अपुरी राहतात. ही परिस्थिती बदलण्यासाठीच क्रीडा सेना राज्यभर उभी राहत आहे.”
ते पुढे म्हणाले, “क्रीडा सेना ही केवळ राजकीय संघटना नसून खेळाडूंच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे. खेळाडूंना न्याय मिळवून देणे, त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे, क्रीडा पायाभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.”
पै. चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा सेनेची सक्षम संघटनात्मक रचना उभारली जाईल. जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करून खेळाडूंच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. तसेच कुस्तीसह कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट आणि इतर सर्व खेळांतील खेळाडूंना समान प्राधान्य दिले जाईल.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील राज्यातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यासाठी क्रीडा सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भव्य क्रीडा महोत्सव, स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काही दिवसांत राज्यभर मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा आणि तालुका कार्यकारिण्यांची घोषणा, खेळाडू संवाद कार्यक्रम, क्रीडा सेनेचा राज्यव्यापी दौरा आणि विविध क्रीडा विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामधून खेळाडूंना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, शिष्यवृत्ती, रोजगार, क्रीडा सुविधा आणि आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.