Mumbai Pune Missing Link Project : मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील मिसिंग लिंक प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच तो प्रवाशांसाठी खुला होईल. एकदा का हा प्रकल्प पूर्ण झाला कि मग खंडाळा घाटातून प्रवास करण्याची कटकट संपणार आहे. प्रवाशांना खंडाळा घाट टाळून थेट पुण्यात जाता येणार आहे, यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि वाहतूक कोंडी कमी होईल.
खरं तर मुंबई ते पुणे प्रवास करताना किंवा मुंबईवरून पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने येताना खंडाळा घाट क्रॉस करणे हे वाहन चालकांसमोरचे सर्वत मोठं आव्हान असते. खास करून शनिवार- रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी दर खंडाळा घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. चालकांना आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. घाटाच्या तीव्र वळणांमधून आणि चढ-उतारांमधून १९ किलोमीटरचा प्रवास असल्याने वाहनचालक अक्षरशः वैतागतात.मात्र आता खोपोली एक्झिट आणि लोणावळ्याजवळील कुसगाव दरम्यान बांधला जाणारा १३-१४ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक’ प्रवाशांसाठी मोठं वरदान ठरेल.
काय फायदा होईल – Mumbai Pune Missing Link Project
मुंबई पुणे मिसिंग लिंकमुळे प्रवासाचे अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होईल आणि विशेषतः गर्दीच्या वेळी किमान २५-३० मिनिटांची बचत होईल. या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे बोगद्याचे काम. या प्रकल्पातील मुख्य बोगदा सुमारे ८.८७ किलोमीटर लांब आहे, तर दुसरा बोगदा अंदाजे १.६७ किलोमीटर लांब आहे. बोगद्याचे सुमारे ९८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे, आणि उर्वरित कामांमध्ये अंतिम कामे, सुरक्षा उपकरणे बसवणे आणि प्रणालींचे एकत्रीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल असं बोललं जातंय. Mumbai Pune Missing Link Project
आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेतील टायगर व्हॅलीच्या सुमारे १८० मीटर उंचीवर असलेला केबल-स्टेड पूल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) मते हा पूल सर्वात गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक आहे आणि सध्या त्याचे डेकिंग, केबल ताणणे आणि संरचनात्मक अंतिम कामे सुरू आहेत. खरं तर सर्वच बाजूनी मुंबई पुणे मिसिंग लिंकची उभारणी आव्हानात्मक होती. मात्र आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे, लवकरच तो प्रवाशांच्या सेवेत येईल.