हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tarkarli Beach । मित्रानो, तुमचं बजेट कमी आहे, परंतु निळ्याशार समुद्राच्या काठावर शांत आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्यायचा आहे? मग हा बातमी खास तुमच्यासाठीच आहे. मित्रानो, निळाशार समुद्र म्हंटल कि तुम्हाला आठवते ते मालदीव… स्वच्छ समुद्रकिनारा, शांतता असल्याने अनेक कपल्स मालदीवला जातात. परंतु मालदीवला जायचं म्हंटल तर गोरगरिबांचे काम नाही. मालदीवचा खर्च हा अनेकांना न परवडणारा असतो. त्यामुळे स्वस्तात मस्त किमतीत मालदीवचा फील घ्यायचा असेल तर तुम्ही कोकणातील तारकर्ली बीच बेस्ट पर्याय ठरतोय. येथील समुद्राचे पाणी निळसर आणि पारदर्शक असल्यामुळे पर्यटकांना अगदी मालदीवमधील समुद्रकिनाऱ्याची आठवण होते.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध समुद्रकिनारा म्हणून तारकर्ली बीच ओळखला जातो. स्वच्छ पाणी, शुभ्र वाळू आणि निळ्याशार समुद्रामुळे पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतो. म्हणूनच तारकर्लीला “महाराष्ट्राचं मालदीव” असं म्हटलं जातं. इथला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं म्हणजे आयुष्यातला अविस्मरणीय क्षण ठरतो. कॅमेऱ्यात टिपण्यापेक्षा डोळ्यांत साठवावा असा हा नजारा आहे.
तारकर्ली बीच केवळ शांततेसाठीच नव्हे तर साहसी पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घ्यायचा असेल, तर तारकर्ली हे सर्वोत्तम ठिकाण मानलं जातं. समुद्राच्या तळाशी रंगीबेरंगी मासे, प्रवाळ आणि सागरी जीवन पाहणं हा एक रोमांचक अनुभव असतो. याशिवाय स्नॉर्केलिंग, पॅरासेलिंग, जेट स्की आणि बोटिंगसारख्या जलक्रीडाही येथे उपलब्ध आहेत. तारकर्लीच्या जवळच अरबी समुद्रात उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतो. बोटीने किल्ल्यावर जाण्याचा प्रवास आणि तेथील ऐतिहासिक अवशेष पाहणे हा अनुभव इतिहासप्रेमींना विशेष भावतो.
ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी तारकर्लीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असतं आणि जलक्रीडाही सुरळीत सुरू असतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने पर्यटन मर्यादित राहतं. तारकर्ली येथे MTDC रिसॉर्ट, स्थानिक होमस्टे, तसेच खासगी रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. समुद्रकिनाऱ्यालगत राहण्याचा अनुभव घेतल्यास सकाळी लाटांचा आवाज आणि संध्याकाळी समुद्रावर मावळणारा सूर्य यांचा आनंद घेता येतो.