हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. आता रेल्वे प्रवास आणखी फायदेशीर ठरणार आहे. कारण भारतीय रेल्वे लवकरच प्रवाशांसाठी नवीन लॉयल्टी प्रोग्राम सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेमुळे नियमित रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोफत चहा-नाश्ता, जेवण, तिकिटांवर सवलत आणि स्टेशनवरील लाउंज अॅक्सेस असे अनेक आकर्षक फायदे मिळण्याची शक्यता आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अधिकाधिक लोकांनी रेल्वे प्रवास निवडावा. विशेषतः जे प्रवासी कमी अंतरासाठी विमान किंवा इतर पर्याय निवडतात, त्यांनाही रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर वाटावा यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
कसे मिळणार रिवॉर्ड पॉइंट्स?
या लॉयल्टी प्रोग्राममध्ये वारंवार रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या अंतरानुसार रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. म्हणजेच, प्रत्येक किलोमीटर प्रवासासाठी पॉइंट्स जमा होतील. प्रवास जितका जास्त, तितके जास्त पॉइंट्स. हे पॉइंट्स थेट IRCTC च्या आधार-लिंक असलेल्या खात्यात जमा होतील. हे खाते एक प्रकारचे डिजिटल वॉलेट म्हणून काम करेल. त्यामुळे प्रवासी हे पॉइंट्स नंतर तिकीट बुकिंग, जेवण ऑर्डर करणे किंवा स्टेशनवरील प्रीमियम सुविधा वापरण्यासाठी रोख पैशासारखे वापरू शकतील.ही संपूर्ण प्रणाली पारदर्शक ठेवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरून तयार केली जाणार आहे.
या योजनेमुळे नियमित प्रवाशांना अनेक अतिरिक्त सुविधा मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रवासादरम्यान मोफत चहा, नाश्ता आणि जेवण, रेल्वे स्टेशनवरील लक्झरी लाउंजमध्ये प्रवेश, तिकीट भाड्यात सवलत, जमा केलेल्या पॉइंट्सवर मोफत रेल्वे तिकिटे. थर्ड एसी वरून सेकंड एसी किंवा सेकंड एसी वरून फर्स्ट एसी मध्ये तिकीट अपग्रेड करण्याची सुविधा, पात्र प्रवाशांसाठी लोअर बर्थसारखे प्राधान्य पर्याय, रिवॉर्ड पॉइंट्स वापरून ई-केटरिंगद्वारे जेवण ऑर्डर करण्याची सोय यांसारखे फायदे मिळतील.
ही योजना सुरुवातीला वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होण्याची शक्यता आहे. जर या योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर पुढे हा लॉयल्टी प्रोग्राम देशभरातील इतर मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्येही लागू केला जाऊ शकतो. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हा उपक्रम भविष्यात जगातील सर्वात मोठ्या लॉयल्टी प्रोग्रामपैकी एक ठरू शकतो. कारण भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आणि हजारो रेल्वे स्टेशन या नेटवर्कमध्ये येतात.