हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jammu Kashmir Tourism । पहलगाम हल्ल्यानंतर बंद असलेली जम्मु काश्मीरमधील सर्व पर्यटन स्थळे उघडण्यात येणार आहे. सध्या बंद असलेली सर्व पर्यटन स्थळे मे महिन्यापर्यंत पुन्हा सुरू होतील अशी माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबतची माहिती विधानसभेत दिली आहे. एवढच नव्हे तर केंद्रशासित प्रदेशातील पर्यटन उद्योगाला आणखी बळकट आणि मजबूत करण्यासाठी सरकार ९ नवीन पर्यटन स्थळे सुरू करण्याच्या योजनांवर काम करत असल्याचेही ओमर अब्दुल्ला (Omar Abdulla) यांनी सांगितलं.
जम्मू काश्मीर विधानसभेत अनुदान मागण्यांवरील चर्चेचा समारोप करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू काश्मीर सरकारने पर्यटन पुन्हा सुरु करण्यावर टप्प्याटप्प्याने काम केलं आहे. अनेकांना असं वाटत होते कि जम्मू कश्मीरमध्ये कधीही आता पर्यटक येणार नाहीत, परंतु आमच्या प्रशासनाने पर्यटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. अनेक स्थळे बंद असूनही आणि प्रमुख ठिकाणी निर्बंध लागू असतानाही हळूहळू टप्प्या टप्प्याने आम्ही सर्व ऍक्टिव्हिटी पूर्वपदावर आणत आहोत. Jammu Kashmir Tourism
पर्यटन पायाभूत सुविधा सुधारणे ही आपली प्रमुख प्राथमिकता आहे, कारण पर्यटक अनेकदा असे निदर्शनास आणून देतात की पहलगाम, गुलमर्ग आणि सोनमर्ग हे अत्यंत सुंदर असले तरी, तेथे शौचालये आणि इतर सुविधांसारख्या पुरेशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. “सरकार या कमतरता दूर करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत दिली. पर्यटकांना आकर्षित करणे, आणि ते पुन्हा पुन्हा याठिकाणी कसे येतील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण पुन्हा पुन्हा पर्यटक आले तर तो मजबूत आणि शाश्वत पर्यटन उद्योग ठरू शकतो.
गुलमर्ग आणि सोनमर्ग सारख्या प्रसिद्ध हिवाळी स्थळांमधील हॉटेल्स आता पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, तर श्रीनगरमध्ये पर्यटकांची लक्षणीय गर्दी दिसून येत आहे असे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं. केंद्राने अनेक पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी काही स्थळे अजूनही बंद आहेत.काही गोष्टी मी उघडपणे सांगू शकत नाही, परंतु मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की केंद्र सरकारशी चर्चा झाली आहे. त्यांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. परंतु तुम्ही असे गृहीत धरू शकता की मे पर्यंत ही सर्व पर्यटन स्थळे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुली होतील असे आश्वासन ओमर अब्दुल्ला यांनी दिले.