New Toll Rules : या प्रवाशांना दुप्पट टोल भरावा लागणार; सरकारने लागू केला नवा नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन New Toll Rules : तुम्ही सुद्धा राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गवरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी अतिशय महत्वाची आहे. प्रवास करताना तुम्हालाही अनेकदा टोल भरावा लागला असेल, fastag च्या माध्यमातून तुम्ही तो भरला असेल. मात्र आता सरकारने महामार्गावरील टोलबाबत नवीन नियम जारी केले आहेत, ज्यानुसार, जर फास्टॅग (FASTag) काम करत नसेल किंवा खात्यातील शिल्लक कमी असेल आणि टोल कापला गेला नसेल, तर ७२ तासांच्या आत पैसे न भरल्यास तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागेल. बॅरियर-विरहित टोल बूथची प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने हा बदल केला आहे.

सरकारनं ‘नॅशनल हायवे फी (डिटर्मिनेशन ऑफ रेट्स अँड कलेक्शन) दुसरे दुरुस्ती नियम, २०२६’ लागू केले आहेत. या अंतर्गत ‘न भरलेलं टोल शुल्क’ (Unpaid User Fee) अशी नवीन व्याख्या करण्यात आली आहे. जेव्हा इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) प्रणालीमध्ये वाहनाची नोंद होते, परंतु बँक खात्यातून किंवा फास्टॅगमधून टोलची रक्कम कापली जात नाही, तेव्हा तो ‘अनपेड टोल’ मानला जाईल. हा नियम विशेषतः बॅरियर-विरहित नवीन टोल बूथसाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे कोणीही पैसे भरणे टाळू शकणार नाही. सध्या, काही लोक टोल न भरता पळून जातात अशा तक्रारी वारंवार येतात.

जर टोलनाक्यावर टोलची रक्कम कापली गेली नाही, तर पहिल्या नोंदणीकृत वाहन मालकाला एक इलेक्ट्रॉनिक सूचना (ई-सूचना) पाठवली जाईल. यामध्ये वाहनाचा संपूर्ण तपशील, जाण्याची तारीख, ठिकाण आणि किती रुपये टोल भरावा लागेल ती रक्कम स्पष्टपणे नमूद केलेली असेल. ही सूचना एसएमएस, ईमेल, मोबाईल ॲप आणि एका समर्पित पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे मला मेसेज आलाच नाही असं कोणताही वाहनचालक म्हणू शकणार नाही. New Toll Rules

जर वाहनचालकने ई-नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासांच्या आत हा थकीत टोल भरला, तर त्यांना जी मूळ टोल रक्कम आहे तेवढीच द्यावी लागेल. मात्र ७२ तास उलटूनही जर हा थकीत टोल भरला नाही तर मग मात्र दुप्पट टोल भरावा लागेल.

आणखी एक गोष्ट म्हणजे जर एखाद्या वाहन मालकाला किंवा चालकाला सूचना चुकीची वाटत असेल, तर ते ७२ तासांच्या आत नियुक्त पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. टोल एजन्सीने पाच दिवसांच्या आत तक्रारीची चौकशी करून तिचे निराकरण करणे आवश्यक आहे. जर ५ दिवसांत तक्रारीचं निवारण झालं नाही, तर तो दंड आपोआप रद्द होईल. New Toll Rules

जर वाहन मालकाने १५ दिवसांपर्यंत टोलची रक्कम भरली नाही आणि तक्रार दाखल केली नाही, तर ही थकीत रक्कम वाहनाच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये नोंदवली जाईल. त्यानंतर गाडीशी संबंधित अनेक महत्त्वाची कामं जसं की नोंदणी, मालकी हक्क हस्तांतरण किंवा इतर सेवांवर बंदी घातली जाऊ शकते. याचा अर्थ असा की, टोल भरल्याशिवाय तुम्ही तुमचे वाहन विकू किंवा त्याचे नूतनीकरण करू शकणार नाही.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading