हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे (Ajit Pawar Death) संपूर्ण महाराष्ट्र आणि पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार आणि विलीनीकरण होणार हे जवळपास नक्की झालं असतानाच अचानक अजित पवार यांच्या निधनाने पवार परिवार कोसळला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची बॉडी लँग्वेजच बरंच काही सांगून जात आहे. काल प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. अजित पवारांच्या निधनाचा मोठा आघात शरद पवारांना बसलाय हे दिसत होते.
आज अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्टान येथे ठेवण्यात आलं त्यावेळी सुद्धा शरद पवार हे अक्षरशः सुन्न झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नि:शब्द करणारे भाव दिसत होते. अजित पवार यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी खाली ठेवण्यात आले. त्याच्या अगदी समोरच शरद पवार हे बसलेले होते. शरद पवार खूपवेळा एकटक अजित पवार यांच्या पार्थिवाकडे बघत होते. अजित पवार यांचा निपचित पडलेला देह आणि त्याकडे एकटक पाहणारे शरद पवार, हे चित्र महाराष्ट्राच्या चटका लावणारे ठरले.
खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काका पुतणे हे एकत्र यायचे. त्यांच्यात कोणतेही वितुष्ट बघायला मिळालं नाही. बारामतीकरांनाही दादा आणि साहेब दोघेही जवळचे असायचे, त्यांनीही कधी दोघात फरक केला नाही. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी म्हणजे नगरपालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत निवडणुक लढवली होती. आता झालं गे विसरून जावा, इथून पुढे आपल्याला एकोप्याने राहायचं आहे, शरद पवार साहेबांचं नेतृत्व हे दुरदृष्टीचे नेतृत्व आहे असं म्हणत अजित पवारांनीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत दिले होते. शरद पवार सुद्धा आजारपणामुळे सक्रिय राजकारणातून काहीसे दूर असल्याने अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार हे जवळपास नक्की झालं होते. मात्र त्यापूर्वी काळाने पवार कुटुंबियांवर घाव घातला.