Ajit Pawar Death । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दुःखद घटना मानली जात आहे.अजितदादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांचा अपघात हा खरच अपघात होता कि यामागे घातपाताची शक्यता आहे? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच शंका उपस्थित करत घातपाताच्या शक्यतांना आणखी बळ दिले.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी ?
अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समजताच मला मोठा धक्का बसला आहे. देशातील लोकांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षेचा काही भरवसा नाही. अजित पवार हे महायुतीपासून दूर जात होते. काही दिवसांपूर्वी मी एक विधान वाचलं होतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून समोरील पक्षातील कोणीतरी विधान केलं होतं की, अजित पवार यांना भाजपाला सोडायचं आहे. त्यात आता जे झालं आहे त्याची योग्य चौकशीझाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखालीच ही चौकशी झाली पाहिजे. इतर कोणतीही यंत्रणा नको. सर्व यंत्रणा विकत घेण्यात आल्या आहेत असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी वेगळीच शंका उपस्थित केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आज आपला मोठा भाऊ गेल्याची भावना आहे. मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी दुर्देवी घटना महाराष्ट्रात आज घडली. या विमान अपघाताची चौकशी नक्कीच होईल, नक्कीच चौकशी झाली पाहिजे, कारण यापुढे अशा प्रकारच्या अपघात होता कामा नये यासाठी हि चौकशी गरजेची आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नेमका अपघात कसा झाला?
प्रत्ययक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान खाली येत होतं तेंव्हा हे क्रॅश होणार हे समजत होतं. आधी वाटलं कि धावपट्टीवर विमान उतरत आहे. पण विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. आग एवढी मोठी होती की कोणालाच वाचवणं शक्य नव्हतं. विमान चालकानेही विमान ट्रॅकवर उतरवण्याचा प्रयत्न केला असणार पण धावपट्टीवर येण्याच्या 100 फूट आधी विमान क्रश झालं आणि अजित पवारांसह विमानातील सर्वच्या सर्व ६ जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे.