हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar funeral । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्टान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा जय पवार आणि पार्थ पवार यांनी अजित पवारांना मुखाग्नी दिला. यावेळी संपूर्ण परिसरात लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देताना बारामतीकरांचे कंठ दाटून आले. अमर रहे!! अमर रहे!!.. अजित दादा अमर रहे!! परत या, परत या अजित दादा परत या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आज सकाळी अजित पवारांचे पार्थिव काटेवाडी येथील मूळ घरात ठेवण्यात आलं, त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा बारामतीच्या विद्या प्रांगणापर्यंत आली. त्याठिकाचे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र आणि देशभरातील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होते. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते बारामतीतच आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीमध्ये सध्या शोकाकुल वातावरण आहे. येथील सर्व बाजारपेठा आणि दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. अजित पवारांच्या रूपाने बारामतीकरांचा आधारच गेला आहे. अजित पवार आणि बारामतीकर यांचे नातं घट्ट होते. अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच मागील काही वर्षात बारामतीचा कायापालट झाला आहे. बारामतीकरांना त्यांचा मोठा आधार होता, काही झालं तरी आपला दादा आहे, त्यामुळे चिंता नाही अशी भावना बारामतीकरांना होती. मात्र आज त्यांचा हाच हक्काचा दादा काळाच्या पडद्याआड गेल्याने बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.