हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar Death In Plane Accident । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी बारामतीत लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाला भीषण अपघात झाला आणि अजित पवारांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. संपूर्ण देशभरातून अजित पवारांबाबत हळहळ व्यक्त केली जातेय. अजित पवारांचे अनेक किस्सेही आज अनेकांना आठवत आहेत.
काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी चाकण येथील एका भाषणावेळी लोकांना सल्ला दिला होता. “राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका. धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा. काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते. बायकोला उभं करा, तू निवडणूक लढ..असं करू नका. पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही, साधुसंतांनीही आपल्याला तेच सांगितले असा कानमंत्र अजित पवारांनी दिला होता. दादांचा तो शेवटचा सल्ला ठरला.
दरम्यान, अजित पवार हे नाव म्हणजे जबाबदारी, वेळेचं भान आणि कामासाठीचा हट्ट. पहाटेच अचानक बसस्थानकात उभं राहून व्यवस्था पाहणारा नेता… रस्त्यांची, सार्वजनिक जागांची प्रत्यक्ष पाहणी करणारा मंत्री… चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठीवर हात ठेवून प्रशंसा करणारा, आणि कामात ढिलाई असेल तर न जुमानता बोल लावणारा कणखर व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच ते जनतेमध्ये ‘दादा’ म्हणून प्रेम आणि आदराने ओळखले जात. आज त्यांचा दिवसाचा कार्यक्रमही तितकाच धावपळीचा होता. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या चार महत्त्वाच्या सभा, स्थानिक नेत्यांशी संवाद, पावसामुळे नुकसानीचा आढावा… कामाच्या या फेरित त्यांना विश्रांती ही शब्दशः माहीतच नव्हती. पण नियतीने अचानक हा वेग थांबवला आणि एक धडाडीचा नेता आपल्या कार्यातूनच नव्हे तर जगातूनही दूर गेला.