Politics News : अजित पवारांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार; नव्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोरात सुरु आहेत. एकीकडे शरद पवारांचा पक्ष विलीनीकरणासाठी आग्रही असताना दुसरीकडे अजित पवार गटातील प्रमुख नेते असलेले प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे हे मात्र विलीनीकरणासाठी अनुकूल दिसत नाहीत, उलट अजितदादा आमच्याजवळ कधीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल बोलले नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. याच दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धक्कादायक दावा करत राजकीय विश्वात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवारांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे.

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण होणार नाही. त्याऐवजी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपमध्ये विलीन होईल, राष्ट्रवादीचे सगळे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. एकनाथ शिंदेंचेही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असं सूचक विधान तरत जसं युनायटे स्टेट ऑफ अमेरिका आहे, तसं इथं ‘युनायटेड नेशन ऑफ भाजप होईल’ असा टोला संजय राऊतांनी लगावला. ‘भाजप हा अदृश्य हात आहे. ही अदृश्य शक्ती आहे.

अमित शहांच्या इच्छेनुसारच सर्व होणार असं जेव्हा प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणत असतात म्हणजे अमित शाहच बोलत आहेत. यापुढे त्यांच्या पक्षाची सर्व सूत्र अजित पवारांनंतर अमित शहांकडे जातील. फडणवीसही यांच्याकडे सुद्धा जाणार नाहीत, ती थेट अमित शहांकडे सूत्र आहेत. माझ्याइतकं इतर कोणीही हे खात्रीनं सांगू शकत नाही. प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे, असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला.

शरद पवार राज्यसभेवर जाणार?

दरम्यान, शरद पवार हे राज्यसभेवर जाणार का? असा सवाल केला असता संजय राऊत म्हणाले, “शरद पवार यांच्याशी माझी या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे की, राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत आणि 60 वर्षांपेक्षा जास्त संसदीय कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जर ही भूमिका व्यक्त केली आहे आणि त्यांची ही भूमिका त्यांनी काँग्रेसला सुद्धा सांगितली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबाबत चर्चा होईल असं संजय राऊत यांनी सांगितले. राऊत यांच्या या विधानामुळे शरद पवार हे अजूनही सक्रिय राजकारणात राहतील हे स्पष्ट आहे. आता महाविकास आघाडी पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात यशस्वी होते का ते बघायला हवं

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading