हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar successor । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अजित पवार हा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणातील कामाचा माणूस होता. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. नेहमी लोकांच्यात राहणार, हातात कागदपत्रे घेऊन लोकांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न तातडीने मार्गी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख अखेरपर्यंत कायम राहिली. मात्र त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाच्या हाती जाणार या चर्चाना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी थेट नावच सांगत मोठी मागणी केली आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी झिरवाळ यांनी केली आहे.
काय म्हणाले नरहरी झिरवाळ ? Ajit Pawar successor
आज अजित पवार यांच्यावर बारामतीतील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद करावे अशी अप्रत्यक्ष मागणी केली आहे. सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावं अशी सगळ्यांची प्रामाणिक इच्छा असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात. राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे. सगळे बारामतीकर म्हणतीलच म्हणतील पण महाराष्ट्रातून सगळेजण म्हणतात की वहिनींना आता सत्तेत आणलं पाहिजे. असे मत नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केलं.
तुतारी – घड्याळ एकच
दरम्यान, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्या आहेत. तुतारी आणि घड्याळ आता एकच आहे. आपल्याला वेगळं होऊन चालणार नाही, एकत्रच राहायला हवं, तीच आपली गरज आहे असं सांगायलाही नरहरी झिरवाळ हे विसरले नाहीत. नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होईल हे सुद्धा जवळपास नक्की मानले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे कोणाच्या हातात जाणार आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे.