हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar In MVA । मागील काही दिवसापासून अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे काका पुतणे एकत्र येताना दिसतायत. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवल्या होत्या. दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्त्येही एकदिलाने काम करताना दिसले. तसेच एका जाहीर सभेत बोलताना झालं गेलं विसरून जा, आता आपल्याला एकोप्याने राहायचे आहे, शरद पवार साहेबांचं नेतृत्व हे दूरदृष्टीचे नेतृत्व आहे असं म्हणत अजित पवारांनी काकांप्रती जरा जास्तच प्रेम दाखवलं. त्यामुळे अजित पवार- शरद पवार एकत्र येऊन भाजपसोबत कायम राहणार अशा चर्चा सुरु झाल्या. सुप्रिया सुळेंना केंद्रात मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार इथपर्यंत चर्चा रंगल्या. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) याना विचारलं असताना राऊतांनी मात्र अगदी याच्या उलट उत्तर देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवारच शरद पवारांसोबत पुन्हा एकदा महाविकास आघाडीत सामील होणार असं म्हणत राऊतांनी सकासकाळीच बॉम्ब फोडला.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले कि, आता शरद पवार हे आता माहाविकास आघाडीत दिसणार नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने तुमच्यासोबत नसतील का ? यावर उत्तर देताना शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा का विचार तुम्ही करत नाही ? असा उलट सवाल संजय राऊतांनी पत्रकारांना केला. कारण शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेत. अजित पवार हे महायुतीत आहेत, मात्र तरीही त्यांनी महाविकास आघाडीसोबत पाट लावला आहे. अशावेळेला आमच्या माहितीनुसार, भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीसोबाबत येतील. अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडावं लागेल. ते दोन दगडावर पाय कसे ठेवणार? अजित पवारांना काहीतरी सोडावं लागेल किंवा काहीतरी स्वीकारावे लागेल असं संजय राऊत यांनी म्हंटल. अजित पवारांचं मन सध्या कुटुंबाकडे आहे त्यामुळे ते महाविकास आघाडीत सामील होतील असा राजकीय बॉम्ब संजय राऊतांनी फोडला.
दरम्यान, भाजपचे नेते अनेकवेळा अजित पवारांना आठवण करून देत असतात कि सिंचन घोटाळ्याची फाईल अजून ओपन आहे. याबाबत विचारलं असता संजय राऊतांनी भाजपचा समाचार घेतला. “मेलं मेंढरू आगीला भीत नाही” अ,ं राऊत म्हणाले. तुम्ही एकदा अजित पवारांना क्लीनचिट दिलीय ना. स्वत पंतप्रधान मोदींनी गर्जना केल्यावरही ते सरकारमध्ये आले. आता कोणत्या तोंडाने तुम्ही अजित पवारांच्या फाईल ओपन करणार आहात? त्या फाईलमध्ये काही आहे की नुसत्या पोकळ डरकाळ्या फोडत आहात? असा सवाल राऊतांनी विचारला. छगन भुजबळ यांच्या विरोधात किती बोंबा मारल्या. ती पहिली केस आहे. भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले. आमच्यासारखे लोकही जेलमध्ये राहिलो. भुजबळ सर्व प्रकरणात निर्दोष झाले. याबद्दल गृहखात्याने आणि ईडीने प्रायश्चित घेतलं पाहिजे. जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे. तोपर्यंत मनाने तनाने धनाने भाजपसोबत आहेत. ज्या क्षणी सत्ता पालटेल तेव्हा मनाने तनाने धनानं ते आमच्यासोबत असतील असंही राऊत म्हणाले.