रायपूर आरोग्य केंद्रात धाड टाकत बच्चू कडूंनी केली व्यवस्थेची पोलखोल

कर्जमुक्तीची आठवण व मेळघाट संघर्ष यात्रेच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रायपूर आरोग्य केंद्रावर अचानक धाड मारली आणि आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली. सदर सरकारी रुग्णालयात नेमके किती डॉक्टर काम करतात? किती दिवस ते रुग्णालयात हजर असतात. कोणकोणत्या सुविधा त्या दवाखान्यात मिळत असून कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होतो का? याचीही माहिती बच्चू कडू यानी घेतली.

मेळघाटातील आदिवासी पाड्यातील बांधवांच्या आरोग्य, वीज, शिक्षण, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या लढ्यासाठी बच्चू कडू यांनी १ मार्च ते ९ मार्च पर्यंत मेळघाटात सेमाडोह ते चिखलदरा अशी २५० किलोमीटरची पायी महापदयात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी बच्चू कडू यांनी रायपूर येथील आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थही त्यांच्या सोबत होते. बच्चूभाऊ कडू यांच्यासारखा नेता अचानकपणे रुग्णालयात आल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. रुग्णालयात दाखल होताच बच्चू कडू यांनी सर्वात आधी किती कर्मचारी उपस्थित आहेत? ते रोज येतात का? हे बघितलं, त्यासाठी त्यांनी रजिस्टर सुद्धा मागवून घेतलं. कर्मचाऱ्यांना पगार किती आहे? किती दिवस ते सुट्या मारतात याची माहिती बच्चू कडू यांनी घेतली. ग्रामस्थांचा आरोप होता कि याठिकाणी काम करत असलेले डॉक्टर सातत्याने सुट्ट्या मारतात, त्याची पडताळणी बच्चू कडू यांनी थेट रुग्णालयात जाऊन केली.

एवढच नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या दवाखान्याबद्दल काही अडचणी आहेत का? रुग्णालयात काम करताना कोणत्या समस्यांना सामोर जावं लागत याची माहिती घेतली. त्यावेळी आम्हाला विजेचा प्रॉब्लेम असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आमच्या दवाखान्यात लाईट नाही, सोलर सिस्टीम आहे, पण बॅटरी बंद असल्याने रात्री ७ वाजताच लाईट जाते. परिणामी आम्हाला ७ नंतर अंधारातच राहावे लागते, एखादा रुग्ण रात्री ७ नंतर आल्यानंतर आम्हाला टॉर्च चा वापर करून उपचार करावा लागतो असं सरकारी डॉक्टरांनी सांगितलं.

यावर हा प्रॉब्लेम किती महिन्यापासून सुरु आहे ? आणि तुम्ही तक्रार का दाखल केली नाही? असा सवाल बच्चू कडू यांनी केला असता आम्ही तक्रार केली, परंतु अजूनही काहीच फायदा झाला नाही अशी उद्दिग्न प्रतिक्रिया सरकारी डॉक्टरांनी दिली. एकूणच काय तर मेळघाटातील सरकारी रुग्णालयाचा पुरता बोजवारा उडाला आहे. आधीच दवाखान्यात डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यातच वीज नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading