हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात कोण कोणाशी युती करेल आणि कोणाशी आघाडी करेल याचा काही नेम नाही आजकालचे राजकारण हे तर राजकारण राहिलेले नाही. यात कोणताही वैचारिक बाणा बघायला मिळत नाही. याउलट जिथे तिथे फक्त आणि फक्त सत्ताकारण बघायला मिळतेय. सत्तेसाठी कोणी कसल्यातही थराला जातोय. असाच काहीसा प्रकार अमरावतीत बघायला मिळाला. एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि MIM ने अचलपूर नगरपरिषदेत युती केली आहे. या अभद्र युतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. BJP- MIM Alliance
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएमने एकत्र येत सभापती बनवत सत्ता स्थापन केलेली आहे. एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत आला आहे. या युतीनंतर एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळाले आहे. भाजप आणि एमआयएम सोबत आली असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हे प्रकरण स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरणात मात्र पारंपारिक विरोधी पक्षांचे एकत्र येणे म्हणून पाहिले जात आहे, कारण भाजप आणि एमआयएम सामान्य राजकीय दृष्टिकोनातून खूप भिन्न मानले जातात. दोन्ही पक्षाची विचारधारा हि पूर्णपणे वेगळी आहे. एकीकडे भाजप हिंदुत्वाचा नारा देत निवडणूक लढवत असते तर दुसरीकडे एमआयएमचा पक्ष हा मुस्लिम समाजाच्या व्होटबँक वर मोठा झाला आहे. या पक्षाचे राजकारण हे कायमच मुस्लिम समाजाभोवती फिरत आलं आहे.
दरम्यान, भाजप आणि एमआयएमच्या युतीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. भाजप आणि एमआयएमची सेटिंग आहे. हे दोघेही जेवताना वेगवेगळे सोबत जेवतात. एक व्हेज खातो आणि दुसरा नॉन व्हेज खातो. एमआयएमचा फायनान्सर कोण आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. हे जे सगळं काही चाललं आहे ते काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी हे सुरू आहे. काही काळासाठी हे चालेल पण एक दिवस यामागची सत्यता बाहेर येईल असा इशाराही त्यांनी दिला.