Chandrapur Mayor Election 2026 : उद्धव ठाकरेंचा भाजपला पाठिंबा!! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Chandrapur Mayor Election 2026 राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोणाचा कायमचा शत्रू सुद्धा नसतो हेच खरं आहे. एकीकडे महाराष्ट्र उद्धव ठाकरेंची शिवसेना हि भाजपची कट्टर विरोधक म्हणून मानली जाते. भाजप नेते आणि उद्धव ठाकरे एकमेकांवर रोजच सडकून टीका करत असतात. मात्र राज्यात वैर असलेल्या या दोन्ही पक्षांनी महापालिकेत मात्र मैत्री केल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागून राहिलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने चक्क भाजपला पाठिंबा देत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचा गेम केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस हे कट्टर विरोधकांत सत्तास्थापनेसाठी चुरस लागली असताना ठाकरे गटाची भूमिका हि किंगमेकरची ठरली होती. सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंचा आम्हालाच पाठिंबा मिळेल असं काँग्रेसकडून सांगितलं जात होते. दोन्ही पक्षाच्या त्यानुसार बैठकाही झाल्या, मात्र तोडगा काही निघत नव्हता. त्यातच आज सकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांची महत्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत खटके उडाल्यामुळे संदीप गिऱ्हे रागात बैठकीतून बाहेर पडले होते. त्यानंतर काहीवेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याचे जाहीर केलं. ठाकरे गट आणि भाजपने वाटाघाटीही केल्या आहेत. त्यानुसार, महापौर पहिले सव्वा वर्ष भाजप, त्यानंतर सव्वा वर्ष शिवसेना ठाकरे गटाचा होणार. उपमहापौरपद देखील शिवसेनेला, आणि पहिलं आणि चौथ्या वर्ष स्थायी समिती देखील शिवसेना ठाकरे गटाला मिळणार असं ठरल्याचं समजत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच कोणत्याही परिस्थितीत भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता मिळून द्यायची नाही, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा होताच सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळे या सर्व घडामोडींबाबत संजय राऊतांना माहितीच नव्हतं का? अशाही चर्चा सुरु आहेत.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading