हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Parth Pawar And Jay Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय एकत्र आले. दुःखाच्या या प्रसंगात एकमेकांना आधार देण्याचं काम सर्वानीच केलं. शरद पवार यांचा काही दिवसापूर्वी पार्थ आणि रोहित पवार यांच्याशी चर्चा करतानाच फोटो संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखा पसरला. पवारांनी अजित पवार यांच्या स्मारकासंदर्भात जय पवार यांच्याशी सुद्धा स्वतंत्र चर्चा केली होती. मात्र आता याच स्मारकावरून अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांच्यात मतभेद असल्याची माहिती सूत्राच्या हवाल्याने समोर आली आहे.
ज्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथेच त्यांचं स्मारक बांधण्याचा पवार कुटुंबाचा विचार असताना स्मारकावरून पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात वेगवेगळी मते असल्याचे समजत आहे. जय पवार यांच्या मते अजित पवार यांचं संग्रहालय पुण्यात करावं आणि स्मारक बारामतीत असावं . अजित पवार यांचे पुणे जिल्हा आणि शहरावर विशेष प्रेम होतं. त्यामुळे दादांचे संग्रहालय पुणे शहरात असावं अशी भूमिका जय पवार यांनी मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडत आपली इच्छा बोलून दाखवली. तर दुसरीकडे पार्थ पवार यांचं मत मात्र पूर्णपणे वेगळं आहे. अजित पवारांचे संग्रहालय आणि स्मारक हे दोन्हीही बारामतीतच असावे अशी पार्थ पवार यांची इच्छा आहे. त्यामुळे आता पवार कुटुंबीय यावर नेमका काय तोडगा काढतात ते पहावे लागेल.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर काही दिवसातच शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात जय पवार आणि पार्थ पवारांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांचे स्मारक उभारण्यासाठी चर्चा केली होती. यासाठी ४ ते ५ बैठका झाल्या. या स्मारकाची संभाव्य रचना कशी असेल? नेमकं कोणत्या जागेत अजितदादांचे स्मारक बांधायचे? यावर सखोल चर्चा झाली. एवढच नव्हे तर या बैठकीनंतर जय पवार हे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर काही अधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत मैदानाची पाहणी करताना सुद्धा दिसले होते. मात्र आता अजित पवारांचे स्मारक आणि संग्रहालयावरून पार्थ आणि जय पवार यांच्यातच काही मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.