हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार यावर अजूनही चर्चा सुरु आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपला ८९ आणि शिंदे गटाला २९ जागा मिळाल्याने महायुतीचाच महापौर होईल आणि तो भाजपचाच असेल याची शक्यता जास्त आहे. मात्र यंदाचे वर्ष हे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहबे ठाकरे यांच्या जन्म शताब्दीचे वर्ष असून त्यामुळे मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा अशी इच्छा शिंदे गटाची असल्याच्या बातम्याही समोर आल्या. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते भास्कर जाधव यांनी आपली मन कि बात बोलत भाजपच्या गोटात खळबळ उडवून देणारं विधान केलं आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव
हे वर्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. म्हणून मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. यावेळी राजकीय मतभेद दूर राहून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर करावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्यावर्षी त्यांना हीच खरी श्रद्धांजली असेल. एकनाथ शिंदे यांना मी आवाहन करतो की त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देऊन शिवसेनेचा महापौर मुंबईत बसवण्यासाठी मदत करावी, असे मोठं आवाहन भास्कर जाधव यांनी केलं . भास्कर जाधव यांच्या या आवाहनावर शिंदे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते बघाव लागेल.
दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागताच देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर बसेल अशी आशा उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली होती. अवघे ६५ नगरसेवक असतानाही उद्धव ठाकरेंनी महापौर पदाबाबत इच्छा व्यक्त केल्याने खळबळ उडाली होती. ठाकरेंच्या मनातील देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस तर नाहीत ना? अशा चर्चा त्यानंतर राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. परंतु, भाजपचे नेते महायुतीचा महापौर होण्याच्या वक्तव्यावर ठाम आहेत. कालच मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत निघाली होती, त्यात मुंबईची महापौर ओपन महिला असणार हे स्पष्ट झालं आहे. मुंबईचे महापौर अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असते तर ठाकरे गटाला महापौरपद मिळण्याची आशा होती, मात्र तिथेही उद्धव ठाकरेंच्या अपेक्षांचा भंग झाला. आता भास्कर जाधव यांनी ठाकरेंच्या महापौरासाठी थेट एकनाथ शिंदेंना साद घातली आहे.त्यामुळे शिंदे गट नेमका काय करतो याकडे सर्वांचं लक्ष्य असेल.