मोदीजी, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा; राऊतांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण इस्राईल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आखातातून भारतात येणारा गॅस पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा असून सर्वसामान्य जनतेच्या मनात भीती आहे. गॅसच्या कमतरतेमुळे हॉटेल व्यवसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅस सुद्धा आणखी किती काळ जाईल याबाबत स्पष्टता नाही. या एकूण पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदीजी, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, हवं तर पाईपलाईनची जबाबदारी शिवसेना घेईल असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

पंतप्रधान मोदी हे एक मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी नाल्यातून गॅस निर्मिती करण्याचा शोध लावला होता. नाल्यामध्ये पाईप टाकायची आणि त्यातून निघणाऱ्या गॅसवर घरातील चुली पेटवता येतात, असे त्यांनी सांगितले होते. त्यांचा तो शोध आम्हाला आता आठवला आहे. आम्ही असा विचार करतोय कि नाल्यातून गॅस निर्मितीचा पहिला प्रकल्प मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर मोदींनी सुरु करावा. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींनाच बोलवावं. यानंतरच संपूर्ण देशभरात आपण असे प्रकल्प तयार करू आणि आखाती देशातील युद्धामुळे गॅसची जी टंचाई झाली आहे ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत पुढे म्हणाले, या कामासाठी लागणारे पाईप्स किंवा इतर आवश्यक साहित्याची व्यवस्था शिवसेना म्हणून आम्ही करायला तयार आहोत. मिठी नदी यशस्वी झाली की यमुना नदीवरही असाच प्रयोग करता येईल कारण यमुना नदीचाही आता नाला झाला आहे. त्यामुळे मोदींचे जे स्वप्न आहे नाल्यातून गॅस निर्मिती करण्याचे ते आखाती देशातील युद्धामुळे आता पूर्ण होईल. तसेच या योजनेसाठी काही अनुदान वगैरे लागणार असेल तर त्यांनी ते ताबडतोब द्यावं असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्रासाठी अतिशय गंभीर परिस्थिती आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे गॅसचा तुटवड्यामुळे कंपन्यांना फटका बसतोय. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील इंजिनिअरिंग प्लांट्सना गॅसची मोठी गरज असते. मात्र, पुरवठा थांबल्याने हे उद्योग आता पूर्णपणे संकटात आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि चाकण मधील ऑटोमोबाईल कंपन्यांना इंधन टंचाईचा मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे फक्त उद्योगच नव्हे तर तर शेतकरी, कष्टकरी वर्ग, हॉटेल व्यावसायिक आणि टाईल्स उत्पादकही भरडले जात आहेत. अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

Leave a Comment

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading