Mumbai Mayor 2026 : मुंबईचा महापौर ठरला!! भाजपकडून या नावाची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Mayor 2026 । अखेर महायुतीकडून मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून अनुभवी नगरसेविका रितु राजेश तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सदर उपमहापौर पद सव्वा वर्षाकरिता असेल. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दोन्ही उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल असं भाजपने आश्वासन दिले होते, ते पूर्ण करत रितु तावडे यांचे नाव जाहीर केलं.

मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. या पदासाठी भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, अखेर यात रितू तावडे यांनी बाजी मारली. रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असणार आहेत. ५३ वर्षीय तावडे या भाजपच्या अभ्यासू नेत्या मानल्या जातात. घाटकोपरमध्ये रितू तावडे यांची मोठी ताकद बघायला मिळते. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून दुसऱ्यांदा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. महत्वाची बाब म्हणजे रितू तावडे मराठा समाजातील खंभीर असं नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात.

मुंबईची सेवक म्हणून काम करणार- Mumbai Mayor 2026

मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर रितू तावडे यांनी भाजप पक्षश्रेष्टींचे आभार मानले. भारतीय जनता पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे. वरिष्ठ जो निर्णय देतात तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो. माझ्यासाठी आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे. माझी मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे, असं रितू तावडे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading