हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन NCP Merger । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चाना वेग आला आहे. स्वतः अजित पवार यांचीच विलीनीकरणाची इच्छा होती असा दावा शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी केला आहे. १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या अधिकृतपणे एक होणार होत्या असं पवारांच्या पक्षाकडून सातत्याने सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे दादा गटातील प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारखे नेते विलीनीकरणावर काहीही बोलण्यास तयार नाहीत, या नेत्यांचा विलीनीकरणाला विरोध असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी एका साप्ताहिकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो असं शशिकांत शिंदे यांनी म्हंटल होते.
काय म्हणाले शशिकांत शिंदे ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करून एक समर्थ आणि एकसंध पक्ष उभा करण्याचे आमचे स्वप्न होते. ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा सुरू होती, त्या वेळी एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. “विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षाची संपूर्ण धुरा आणि नेतृत्वाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा आमचा मानस होता. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रचार करणाऱ्या साप्ताहिकातून प्रदेशाध्यक्षांनीच असा दावा केल्यामुळे या विधानाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. शशिकांत शिंदे यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्षाची ताकद आणखी मजबूत करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची प्रक्रिया आता अधिक वेगाने पुढे जाण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी तब्बल १४ बैठका झाल्याचा दावा करण्यात आला होता. एका बैठकीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अर्थात आता अजित पवार यांच्या निधनानंतर या संपूर्ण प्रक्रियेत सुनेत्रा पवार यांची भूमिका आता निर्णायक असणार आहे.