हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चाना उधाण आलं आहे. एकीकडे शरद पवार गटाचे प्रमुख नेते विलीनीकरणासाठी ठाम असून स्वतः शरद पवारांनीच सांगून टाकलं आहे कि अजित पवारांचीच इच्छा होती कि दोन्ही पक्ष एक व्हावं. मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या गटातील नेते मात्र विलीनीकरणासाठी एव्हडे अनुकूल दिसत नाहीत. अजितदादा विलीनीकरणाबाबत आमच्याशी काहीच बोलले नाहीत असं दादा गटातील नेते सांगत आहेत. याच दरम्यान आता अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी विलीनीकरणासाठी ३ अटी घालत खळबळ उडवून दिली आहे.
काय आहेत अटी –
- दोन ताईंपैकी सुनेत्रा ताई आमच्या नेत्या आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात शरद पवार यांचा पक्ष विलीन झाल्यावर, सुप्रियाताईंचा रोल काय राहील हे ठरवू. पण नेतृत्व सुनेत्रा ताई यांच्याकडे असेल.
- आम्हाला एनडीए सोबत रहायचं आहे. आमचं चिन्ह घड्याळ असल्याने शरद पवार गटाने घड्याळ स्वीकारावे. तसेच सुनेत्रा पवार याच आमच्या पक्षाच्या अध्यक्ष राहतील.
- दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी आपल्याला एनडीए सोबत राहावे लागेल. एनडीएसोबत येत नसेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन फायदा नाही असं धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलं. त्यांच्या या अटींवर आता शरद पवार गटाच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल.
दरम्यान, दुसरीकडे आज शरद पवार यांची अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत बैठक सुरु आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महत्त्वाच्या संस्थांमधील पदांची वाटणी पवार कुटुंबात वाटणी केली जाणार असल्याचं बोललं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. अजितदादा अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी होते. माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे संचालक, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त यासारखी पदं अजित पवार सांभाळत होते. अजित पवारांच्या निधनानंतर या पदांवर आता त्यांच्याच घरातील कोणत्या तरी सदस्यांची वर्णी लागेल. यामध्ये पार्थ आणि जयचे नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांच्या जागी विश्वस्त म्हणून पार्थ किंवा जय पवार यांना घेण्यात येणार आहे तर अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा झाल्याचे बोललं जातंय.