हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून आणि महायुतीला बहुमत मिळूनही शिंदे गट आणि भाजपमध्ये महापौर पदावरून वाद असल्याच्या चर्चा सुरु आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपला ८९ तर शिंदे गटाला २९ जागांवर यश मिळाल्यानं भाजपचाच महापौर बसेल हे स्पष्ट होते, मात्र एकनाथ शिंदेनी अचानकपणे आपल्या सर्व विजयी नगरसेवकांना हॉटेल मध्ये ठेवल्याने चर्चाना उधाण आलं होते.यंदाचे वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने आम्हाला महापौरपद मिळावे अशी शिंदे गटाची इच्छा असल्याच्याही बातम्या पसरल्या होत्या. मात्र आता भाजपने मुंबईच्या महापौरपदावरून शिंदे गटाला स्पष्ट इशारा दिला आहे.
खरं तर निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरही मुंबईत महायुतीचा महापौर बसेल असं विधान भाजप नेत्यांकडून केला जात होता. फक्त भाजपाचाच महापौर होईल असे कुठेही भाजप नेत्यांनी म्हंटल नव्हतं, त्याबाबत त्यांनी सावधगिरी घेतली होती. मात्र आता सगळं काही हातात आल्यानंतर भाजपचे सूर बदलले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महापौरपदाबाबत भूमिका स्पष्ट करत शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. महापौर होईल तर भाजपचाच होईल नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू, दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यात भाजपच्या नगरसेवकांना कुठलीच रुची नाही असं मुनगंटीवार म्हणाले. त्यांचे हे विधान हे अप्रत्यक्षपणे शिंदे गटालाच इशारा असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता सगळ्या अडचणी पाहता नवीन महापौराची निवड फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. मुंबईत महापौर पदासाठी ओपन महिलेला आरक्षण सुटले आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा महिलाराज बघायला मिळेल.