पवारांनी ठाकरे बंधूंची साथ सोडली? मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून एक मोठी राजकीय घडामोड समोर येतेय. मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2026) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी निवडून येताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अजित रावराणे हे तुतारीवर निवडून आले होते, मात्र निवडून आल्यानंतर अजित रावराणे (Ajit Raorane) यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. विकासासाठी आपण शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचं अजित रावराणे यांचं म्हणणं आहे.

खरं तर मुंबई महापालिका निवडणूक राज ठाकरे (Raj Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवली होती. ऐनवेळी काँग्रेसने जरी ठाकरे गटाशी युती नाकारली असली तरी शरद पवारांनी मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना साथ दिली होती. या निवडणुकीत शरद पवारांना अपेक्षित असं यश मिळालं नसले तरी मालाडमधील प्रभाग क्रमांक ४३ मधून अजित रावराणे हे तुतारी चिन्हावर निवडून आले होते. मात्र आता हेच अजित रावराणे आता महायुतीकडे सरकले आहेत. मुंबई महापालिकेसाठी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. गेल्या काही काळापासून प्रभागातील विकासकामांसाठी लागणारा निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे आपण महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याचं अजित रावराणे यांनी म्हंटल आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या एकूण सर्व घडामोडींवर नेमकी काय प्रतिक्रिया देण्यात येते ते आता पाहावे लागेल.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना सत्ता गमवावी लागली. मराठी माणसाच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येऊनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना यश मिळालं नाही. एकूण २२७ जागा असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपला सर्वाधिक 89 जागा जिंकता आल्या. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकता आल्या. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार हे आता निश्चित झालं आहे. 11 फेब्रुवारीला निवडणुकीआधी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading