हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sharad Pawar To Contest Rajya Sabha Election । महाराष्ट्रातील ७ खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ या एप्रिल महिन्यात संपणार आहे. यामध्ये जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही समावेश आहे. शरद पवार यांचे वय सध्या ८६ वर्ष आहे आणि आजच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशावेळी ते पुन्हा राज्यसभेवर जाणार का? कि संसदीय राजकारणातून निवृत्ती घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. शरद पवारांकडे आमदारांची संख्याही इतकी नाही कि ते शरद पवारांना राज्यसभेवर पाठवू शकतील. परंतु महाविकास आघाडीची एकत्रित ताकद शरद पवारांना नक्कीच पुन्हा राज्यसभेचा दरवाजा उघडून देऊ शकते. परंतु खरंच सध्याच्या राजकीय परिस्थितीत शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवतील का? याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवार यांच्याशी माझी या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे की, राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत आणि 60 वर्षांपेक्षा जास्त संसदीय कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जर ही भूमिका व्यक्त केली आहे आणि त्यांची ही भूमिका त्यांनी काँग्रेसला सुद्धा सांगितली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबाबत चर्चा होईल असं संजय राऊत यांनी सांगितले. राऊत यांच्या या विधानामुळे शरद पवार हे अजूनही सक्रिय राजकारणात राहतील हे स्पष्ट आहे. तसेच त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.आता महाविकास आघाडी पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात यशस्वी होते का ते बघायला हवं.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांची मुदत एकाच वेळी संपत असल्याने, कोणाला पुन्हा निवडून आणायचे हा पेच तर आहेच . राज्यसभेसाठी स्वतंत्र उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणणे महाविकास आघाडीला शक्य नाही. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे २०, काँग्रेसकडे १३ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे अवघ्या १० आमदारांचे बळ आहे. अशावेळी सध्याची परिस्थिती पाहता, तिन्ही पक्ष मिळून एकच संयुक्त उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतात, असे चित्र दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जर शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभा निवडणूक लढवणार असतील तर ठाकरे गट आणि काँग्रेस त्यांना साथ देऊ शकते आणि निवडून आणू शकते.